Summary of the Book
हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो आणि लिअर या जबरदस्त व्यक्तिरेखा खर्या; पण मूलत: या 'मनोवृत्ती’ आहेत आणि 'मनोवस्था’ देखील आहेत. कोणे एके समयी माझ्या मनात असा विचार आला, की ह्या चार मनोवस्था असतील, तर त्या एकाच माणसाच्या आयुष्यात भिन्न भिन्न काळी संक्रान्त होणेही शक्य आहे. त्यातून शोध घेताना एक दिवस या सर्व शोकात्म नायकांच्या जीवनसंघर्षाचे एक सूत्र मला सापडले. ही कहाणी अशा एका माणसाची आहे, की जो जन्मभर एकाकी राहिला, उद्ध्वस्त झाला- प्रथम त्याच्या आईमुळे, नंतर त्याच्या बायकोमुळे आणि नंतर त्याच्या मुलीमुळे. या सूत्राबरोबरच माझ्या मनात एक आकृतिबंध उभा राहिला. पहिल्या अंकात हॅम्लेट, दुसर्या अंकात मॅकबेथ-ऑथेल्लो आणि तिसर्या अंकात किंग लिअर-
या मनोवृत्तींचे संक्रमण कालान्तराने, पण एकाच नायकाच्या आयुष्यात घडत जाते.
हे सूत्र आणि हा आकृतिबंध मनात बाळगून भारतीय मातीतून मी एक नाट्यकृती घडविण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचेच नाव 'गगनभेदी’.