Summary of the Book
फायनल ड्राफ्ट मी चारदा पाहिलं. हे नाटक मी प्रथम पाहिलं तेव्हा मी इतका प्रभावित झालो होतो की त्यानंतर मुंबईत झालेला एकही प्रयोग मी सोडला नाही.
विचाराला चालना देणं आणि त्याचवेळी उच्च दर्जाची करमणूक करणं ह्या दोन्हींचा मेळ या नाटकात घातलेला आहे. तो अपूर्व आहे. या नाटकानं माझी भरपूर करमणूक केली, हे पूर्ण आदरानं सांगू इच्छितो. पण करमणूक ही तात्पुरती असते. हे नाटक त्याच्या खूप वर जातं. मनात रेंगाळत जातं, जितका जास्त विचार करावा तितकं जास्त काही सांगू पाहतं. जितक्यांदा पहावं तितकं अधिकाधिक बारकावे लक्षात येऊन जास्त आवडत जातं.
मला वाटतं गंभीर आशय हसतखेळत सांगण्याची जी किमया तुम्ही या नाटकात केली आहे ती केवळ अजोड आहे. साहित्याची निर्मिती हा कधी नाटकाचा विषय होऊ शकेल असं मला याआधी कुणी सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता. तो इथं पुर्या ताकदीनं आला आहे. पण त्याची चर्चा करता करता ते प्रत्यक्ष आयुष्याबद्दल केव्हा सांगायला लागतं ते कळतच नाही. नाटकाची बांधणी अतिशय घट्ट आहे. दोन-तीन वाक्यांत एखादी घटना, व्यक्तिरेखा उभी करायचं तुमचं कसब दांडगं आहे.