Summary of the Book
मानवी मनोव्यापाराचे लहानसहान असंख्य पदर उलगडून दाखविणारा शेक्सपीअर हा देश, धर्म, प्रांत आणि संस्कृतीच्या पल्याड पोचला तो त्याच्या अजरामर नाटय़ आणि साहित्यकृतींनी! मानवी भावभावना आणि त्यातील नातेसंबंधांचे गुंते हे कुठल्याही संस्कृतीत सारखेच असतात, यावर जणू शेक्सपीअरच्या असंख्य व्यक्तिरेखांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कालातीत ठरलेल्या या नाटय़कृतींचा गोष्टीवेल्हाळ कथास्वरूपात आस्वाद घेण्याची संधी मराठी वाचकांना ‘कथारूप शेक्सपीअर’ या ग्रंथरूपात मिळाली आहे.
प्रभाकर देशपांडे साखरेकर लिखित ‘कथारूप शेक्सपीअर (खंड १)’ हा ग्रंथ औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ने प्रकाशित केला आहे. या कथाखंडात शेक्सपीअरच्या ‘रोमिओ अॅण्ड ज्युलिएट’, ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लियर’, ‘मॅकबेथ’, ‘ज्युलियस सीझर’, ‘अँटनी अॅण्ड क्लिओपात्रा’ या सात शोकान्तिकांचा समावेश आहे.