Summary of the Book
मराठी भाषेतील अनेक ओवीबद्ध ग्रंथांचे आजही घराघरांमध्ये श्रवण व पठण केले जाते. श्रीगुरुचरित्र, गजानन विजय, नवनाथ भक्तीसार, शिवलीलामृत याप्रमाणेच श्री खंडोबा यांची उपासना व अवतारलीला 'श्री मार्तंड भैरव' या ग्रंथातून सांगतली आहे.
मल्लारी देवाचे चरित्र सांगणाऱ्या कवी गंगाधर विरचित 'श्रीमार्तंडविजय' या ग्रंथाचे संपादन श्रीकांत गोवंडे यांनी केले आहे. ३३ अध्यायांची ही पोथी ओव्या व कथासाराच्या स्वरूपात आहे. सुरवातीस ग्रंथाची माहिती, पारायण महात्म्य, मल्लारी मार्तंडाची ओळख करून दिली आहे.
कवी गंगाधर यांचा परिचय करून दिला आहे. या पोथीतील चार हजार ५६४ ओव्यांमधून कवीने खंडोबाच्या उपासनेसंबधी सविस्तर सांगतिले आहे. खंडोबा, त्याची विविध रूपे, मूर्ती, पूजाविधी, विविध प्रकारचे नैवेद्य, व्रत, माणस व ध्यानपूजा, आख्याने, यात्रा, नवस आदी अनेक विषय त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आहेत.
मल्लासुराकडून ऋषींचा व गो-ब्राम्हणांचा छळ, शिवसभा, मणीदैत्य, मल्लासूर आणि शिव यांचे युद्ध, मार्तंड अवतार व म्हाळसा यांची पूर्वपीठिका, बाणाई, जानाई व रंभाई यांचे आख्यान अशा सर्व कथा ओव्यांमधून कथन केल्या आहेत.