Summary of the Book
समाजाला अन्न पुरविणार्या शेतकर्याचे शत्रू अनेक. पाऊसपाणी आणि हवामानाची मनमानी, शासकीय यंत्रणा, स्पर्धक स्वार्थी शेजार-पाजार, पिकावरच्या किडी आणि रोग, अनिश्चित बाजारपेठ, अशा कितीतरी अडचणींवर मात करीत शेतकरी बेजार होऊन जातो. पण या सगळ्यांध्ये मोठा शत्रू असतो तो स्वत:च होईल तो खर्च, आणि येईल ती जमा ही त्याची वृत्तीच त्याला धोका देते. आणि मग तो गळफास लावून घ्यायला प्रवृत्त होतो.
शेतकर्याला अनुभवाने येणार्या शहाणपणात बाहेरूनही भर घातली गेली पाहिजे. आता तो निदान साक्षर तरी व्हायला लागलाय. शेतीविषयक सल्ला देणारं लिखित साहित्य, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरून प्रस्तृत होणारी शेती विषयक माहिती तो आता समजावून घ्यायला लागलाय. पण त्या माहितीचा उपयोग करून घेताना सारासार विचार करायची सवय त्याने लावून घेतली पाहिजे. शेतीकामाचं नियोजन करायला शिकलं पाहिजे. तरच शेती फायद्याची करून घेता येईल. या दृष्टीनेच नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाचे श्री. अनिल सांबरे यांनी किसान नियोजक ही मार्गदर्शक दैनंदिनी प्रकाशित केली आहे. या उपयुक्त दैनंदिनीमध्ये माहिती मिळण्यासाठी उपयोगी कृषि-विद्यापीठांचे पत्ते, तक्रार संपर्कासाठी शासकीय पत्ते, तलाठ्यांच्या कामाची पूर्ण माहिती, शेतकर्यांच्या हक्कांची माहिती, स्वत: विषयीची साद्यंत माहिती, मजुरीचे तक्ते, हिशोब, मणकी मजुरी हिशोब, हजेरी तक्ते, सालदारी माहितीचे तक्ते, बियाणे, अवजारे, कीटकनाशके व इतर साहित्य खरेदी, वापरायचे तक्ते पीकवार खर्च नोंदणी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्ज देणी-घेणी विषयक नोंदतक्ते अशी भरगच्च माहिती असलेले भरपूर साहित्य श्री. सांबरे यांनी दिले आहे. ही माहिती लिहून ठेवायची म्हणजे त्या नोंद वहीचा सुटसुटीत आकार, कागदाची प्रत, आणि बांधणी यांचाही विचार व्हायला हवा. तो, नचिकेत प्रकाशन यांनी केला आहे. आता जागृत होणारा शेतकरी या दैनंदिनीचं मनापासून स्वागत करील अशी खात्री वाटते. प्रत्येकाच्या संग्रही ती असलीच पाहिजे. म्हणजेच आजचा किसान स्वनियोजक होईल.