Summary of the Book
लहान मुलांचे विश्व समजून घेणे ही अवघड गोष्ट आहे. त्यासाठी त्यांचे मानसशास्त्र समजावून घेणे गरजेचे असते. लेखिका, कवयित्री हेमा लेले यांनी ते समजावून घेऊन मुलांच्या मनात हळुवार प्रवेश केला आहे. या दोन्ही पुस्तकातील लेखांमधून त्यांनी हे विश्व उलगडले आहे. पहिल्या भागातला पहिलाच लेख मुलांना आपल्या आजोबांबद्दल वाटणारी माया दाखविणारा आहे.
मुलांची प्रायव्हसी, ट्रेनिंग, वॉर्निंग, गुरु, वचन, रॅगिंग, दुःख आदी विषय पहिल्या भागात हाताळले आहेत. दुसऱ्या भागात वय, अस्वच्छता, खेळ, भरपाई, कवितेचं शिबीर, जाहिरात, भाषा, छंद, मॉल संस्कृती आदी विषय हाताळले आहेत. लेखिकेने मुलांचे आजकालचे विषय गोष्टीरूप पद्धतीने हाताळले आहेत. मुलांबरोबर त्यांचे पालक, शिक्षक यांच्या मनाचाही वेध घेतला आहे.
हेमा लेले यांनी बालसाहित्यात ठसा उमटविलेला आहे. पालक आणि बालक यांनी एकमेकांना समजून घेणाऱ्या या कथा आहेत. या कथा बालमन समजून घेणाऱ्या पालकांसाठी आहेत. नव्या पिढीशी सुसंवाद साधण्यासाठी आहेत. यातील कथा दिशादर्शक आहेत. अनाठायी, अवास्तव अपेक्षांना लगाम घालण्यासाठी आहेत. बालमानसशास्त्राचे उत्तम आकलन कथांद्वारे केले आहे.