Summary of the Book
नवकविता ही मराठी कवितेच्या विकासातील एक महत्त्वाची आणि क्रांतीसदृश घटना. केशवसुत ते कुसुमाग्रज या कालखंडातील रोमॅंटिक कवितेपासून अलग होऊन आपले मूल्यगर्भ वेगळेपण सिद्ध करणारी व नवी अभिरुची घडविणारी. या उलथापालथीत करंदीकरांनी केलेले कार्य मोठे आहे. आशयाच्या किंवा घाटाच्या बाबतीत कसलाही साचा पुढे न ठेवता जाणीवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनासाठी अस्वस्थ होणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर सामाजिक वास्तवाला भिडू पाहणारी, विचार, भावना व संवेदना यांचा संमिश्र वेध घेणारी अशी ही कविता एकाच वेळी गहन सांस्कृतिक संदर्भांना आत्मसात करते आणि रूढ संकेतांना धुडकावून लावते. तिच्यातील रांगडा जोमदारपणा, खोल चिंतनशील आणि मर्मभेदक उपहास रसिकांच्या हृदयाला तसेच डोक्यालाही जाऊन भिडतो. महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगांवकर यांनी हे कठीण काम करीत असताना प्रस्थापित समीक्षेतील रूढ चौकट व सोपी समीकरणे बाजूला ठेवून काव्याला भिडण्याची मर्मज्ञ रसिकता आपल्या संपादनामध्ये दाखविली आहे. करंदीकरांच्या निवडक कवितांचा एकमेव संग्रह.