वनिता पटवर्धन
10 Jun 2025 10 30 PM
दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये साठ लक्ष ज्यू स्त्री, पुरुष, मुले, बाळे यांची जर्मनीतील नाझी आणि त्यांचे सहकारी यांनी पद्धतशीर आणि क्रूर कत्तल (Holocaust होलोकास्ट) केली. सन १९४२ च्या अखेरीला रुमानियामध्ये दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंच्या अमानवी हत्येच्या बातम्या येत होत्या. होलोकास्टमधून आश्चर्यकारकरित्या परतलेले 'मोशे बीडल' हे धार्मिक गृहस्थ रुमानियामध्ये सिगेट या गावात घराघरांत जाऊन, विनवून त्याविषयी सांगत फिरत होते; पण एवढे क्रौर्य असू शकत नाही, रशियन जर्मनांचा पराभव करतील, देव तारेल या आशेवर लोक होते. काहींचा 'आपल्या भल्यासाठीच हद्दपारी आहे’, असा बिनबुडाचा आशावादही असतो. अखेर मार्च १९४४ मध्ये, जर्मनीने हंगेरी ताब्यात घेतली. मग रुमानियातील सिगेटमधील या पुस्तकाचे मूळ लेखक एली वायझल यांच्या कुटुंबासह सर्व ज्यूंना बंदिवासातील वस्तीमध्ये (घेटो) ठेवण्यात आले. तेव्हा एली वायझल १५ वर्षांचे होते. वायझल कुटुंबाला घेटोमध्ये जाण्यापूर्वी व नंतरही देशाटन करणे शक्य होते, पण एली यांच्या वडिलांनी ते नाकारले! मग मे १९४४ मध्ये, जर्मन दबावाखाली, हंगेरियन अधिकाऱ्यांनी सर्व ज्यू समुदायाला ऑश्विट्झ (Auschwitz) छळछावणीत पाठवण्यास सुरुवात केली, जिथे ९०% अक्षम लोकांची हत्या करण्यात आली. अर्थात त्यात शेकडो तान्ही बाळेही होती!
केवळ १८० पानांमध्ये हे छोटेखानी मराठी पुस्तक अतिशय भयानक आणि विषण्ण करणारा अनुभव देऊन जातं! याचं कारण म्हणजे त्यात लेखकाने होलोकास्टच्या स्वानुभवावर आधारित आत्मकथन केलेले आहे. वायझल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या १९४४ ते १९४५ या काळातील स्वतः व वडील यांचे ऑश्विट्झ (Auschwitz) आणि बुचेनवाल्ड (Buchenwald) या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधील किंवा छळछावणीतील अतिशय अमानुष आणि दारुण अनुभव नोंदवलेले आहेत. पिता-पुत्राचा मृत्युशी संघर्ष चित्रमय, साध्या शैलीत मांडला आहे.
वायझल आणि त्यांचे वडील जोपर्यंत सक्षम होते, तोपर्यंत त्यांना कामगार म्हणून निवडण्यात आले. वायझल यांच्या डाव्या हातावर "A-7713" कैदी क्रमांकाचा टॅटू होता. पुढे दोघांना बुचेनवाल्ड छळछावणीत नेल्यानंतर, ती छळछावणी मुक्त होण्यापूर्वी केवळ काही दिवस आधी त्यांचे वडील मरण पावले. वायझल यांनी अमानवी वातावरणात आपल्या वडिलांना कणाकणाने मरताना पाहिले. लहानपणी धार्मिक ग्रंथ, गूढविद्या यांत खूप रस असणारे लेखक धर्माबद्दल होलोकास्टनंतर अश्रद्ध बनतात.
एप्रिल १९४५ मध्ये अमेरिकेने ती छावणी मुक्त केली.
छळछावण्यांमधील बेदम मारहाण, भणंग स्थितीतील प्रचंड उपासमार, नग्नावस्थेत अंघोळी, बर्फमय थंड रात्रीत ४२ मैल संचलन, हळूहळू सर्व आगगाडीभर पसरत गेलेला पराकोटीचा आक्रोश, प्रेतांच्या ढीगाऱ्यांत दबून कसेबसे तगणे यांचे वर्णन पुस्तकाच्या पानापानांमध्ये आहे. हे कमी झाले म्हणून की काय -- जळलेल्या देहांचा धुरकट गंध, आगीत फेकलेली तान्ही बाळे, हजारोंसमोर विनाकारण दिलेल्या व जवळून निरखायला लावलेल्या फाशी, वृद्ध वडिलांच्या हातातला पावाचा तुकडा जबरदस्तीने हिसकावून घेतांना एखाद्याचे वडील आणि मग इतरांसोबतच्या जिवाच्या आकांताने केलेल्या झटापटीत झालेला स्वतःचाही मृत्यू, मृतांच्या अंगावरील सर्व कपडे काढून चालत्या आगगाडीतून फेकलेली नग्न प्रेते असे हृदय विदारक प्रसंग वाचतांना आपण सुन्न होतो! सुरुवातीला पेटलेली बंडाची एक ठिणगी लगेच विझून गेलेली असते. सुटका झाल्यावर सर्वजण जेवणावर तुटून पडले. कुटुंबीयांची आठवणही नाही झाली! पोट भरल्यावरही सूडाची कोणतीही भावना नव्हती, हे विशेष!
"मी मेलो तर ते वडीलही मरतील, हे मला स्पष्टपणे माहीत होते आणि अत्यंत क्रूर अशा छळछावणीमध्ये जगण्याचा प्रयत्न करण्यामागील ही एकमेव जबरदस्त प्रेरणा होती," असे वायझल यांनी नमूद केलेले आहे! पुस्तकात त्यांनी आपल्या वडिलांना अमानुष मारहाण होतांना मदत करण्यास असमर्थ असल्याने वाटणारी शरम, अपरिमित दुःख नोंदवले आहे.
मानवाची आत्यंतिक क्रूरता आणि ती अक्षरशः जीवाच्या आकांताने सहन करणारी मृतवत् शरीरे या पलीकडचे थक्क करणारे काही अनुभव पुस्तकात आहेत. पहिल्या छळछावणीमध्ये पोचण्यापूर्वीच, रेल्वे प्रवासात सॅश्टर ही तेजस्वी डोळ्यांची महिला दोन दिवस व रात्र आगीचे व भट्टीचे भयानक दृश्य दिसल्याचे किंकाळ्या मारून सांगत राहते. तिला जणु 'दूरदर्शन' होते! छळछावणीमध्ये धार्मिक दिवसांना हजारो मरणासन्न ज्यूंनी केलेली एकत्रित प्रार्थना व उपवास हे अनाकलनीय ठरते! प्रचंड मारहाणीमुळे विव्हळणाऱ्या वायझल यांना एक मुलगी मोठा धोका पत्करून 'धाकटा भाऊ' असे संबोधून समजावते आणि मग अनेक वर्षांनी एका मेट्रोत ते एकमेकांना ओळखतात व बोलतात! ग्लिवित्झच्या छावणीतील कोंदट बराकीत जिवंत माणसांवर गुदमरलेल्या प्रेतांचे ढीग असतांना वॉर्साचा तरुण ज्युलीक उराशी कवटाळलेले व्हायोलिन वाजवत शेवटचा श्वास घेतो! स्वतःच्या थडग्यावरून सुरेल वादन!! हा प्रसंग आपण कधीतरी विसरू शकू?
हे पुस्तक म्हणजे सखोल जीवन चिंतन आहे. स्वतःच्या दुःखाच्या वर्णनाबरोबर मानवी स्वभावावरील लेखकाचे भाष्य अत्यंत अर्थघन आहे. मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक आशा कर्दळे यांनी या इंग्रजी पुस्तकाचा प्रत्ययकारी व उत्कट मराठी अनुवाद केलेला आहे.
ज्यू परंपरेनुसार २४ तासाच्या दिवसाची रात्र, पहाट, दिवस अशी त्रयी असते. त्यांचा नवीन दिवस रात्री सुरू होतो. Night ही त्रयीतील पहिला प्रहर आहे, जो 'होलोकॉस्ट'चा प्रवास आहे. हे अंधारातून प्रकाशाकडे संक्रमण आहे. "रात्रीमध्ये" वायझल म्हणतात, "मला शेवट, घटनेचा शेवट दाखवायचा होता. तेव्हा सर्वकाही संपले होते - माणूस, इतिहास, साहित्य, धर्म, देव! काहीही शिल्लक नव्हते. आणि तरीही आपण पुन्हा रात्रीपासून सुरुवात करतो."