Summary of the Book
पाककृतींवरची पुस्तकं वा दूरचित्रवाणीवरील मालिकांची आता वानवा नाही, तरीही मनाच्या कप्प्यात रुतून बसलेला एखादा पदार्थ- ज्याची चव अद्याप रेंगाळतेय, त्या पदार्थाशी निगडित आठवण अजूनही जागी आहे, असे पदार्थ या रेसिपी शोजमध्ये सापडणे तसे कठीणच! पण अलीकडेच प्रकाशित झालेल्या तीन पुस्तकांमध्ये असे चवदार आणि आठवणीतले पदार्थ आणि त्याची रेसिपी सापडण्याची शक्यता दुणावली आहे.
विवेक ताम्हाणे लिखित शेफ रेसिपीज, शीला बारपांडे आणि प्रणाली बारपांडे लिखित सासू-सुनेची शाकाहारी मेनू डायरी आणि गोमती सावर्डेकर लिखित माय गोवा- गोवन रेसिपीज ही ती तीन पुस्तके. अस्सल खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी यात एकाहून एक सरस पाककृतींचा समावेश केला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशनने प्रकाशित केलेले ‘शेफ रेसिपीज’ हे ग्लॉसी पेपर वापरलेले पुस्तक आशय आणि मांडणीच्या दृष्टीने उजवे ठरते. पाककृतींसमवेत पदार्थाच्या अप्रतिम छायाचित्रांनी सजलेले हे पुस्तक वाचताना डोळेही निवतात.
या पुस्तकात थंड पेय, मॉकटेल, लो कॅल ड्रिंक, हेल्दी सॅलॅड, हेल्दी टोमॅटो, ओन्ली फ्रूट चॅट, बर्गर, पनीर, सब्जी बहार, सिम्पल एण्ड टेस्टी, पास्ता, ग्रेव्हीज्, कोफ्ता, चिवडा, मसाले, लोणची, चटण्या, मुरंबा, जेली, जॅम, खिचडी, पकोडा, पराठे, केक, डेझर्ट, सणासुदीचे पदार्थ, मालवणी पदार्थ, गुजराती स्पेशल पदार्थ, अफगाणी पदार्थ, मेक्सिकन पदार्थ, थाय फूड, कॉन्टिनेन्टल फूड असे स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत.
प्रत्येक पदार्थाच्या सुरुवातीला त्यासंबंधातील पूरक माहितीही देण्यात आली आहे. यात तो पदार्थ, त्याचा संक्षेपात इतिहास, त्यातील विविध अन्नघटक तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व अशी विविध माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. ही माहिती वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी आहे. प्रत्येक पदार्थाला आपला असा स्पेशल टच देण्यात शेफ विवेक ताम्हाणे यशस्वी झाले आहेत.