Summary of the Book
सतीश मंडलेकर यांचा ‘सिंहावलोकन’ हा दुसरा कथासंग्रह रसिक वाचकांच्या सेवेत सादर होत आहे. व्यवसायाने इंजीनिअर असणाऱ्या व्यक्तीने साहित्याच्या दालनात आपल्या अनुभवसिद्ध लेखणीतून स्वमनातील व्यथा- वेदना आणि प्रसंगी आनंदाची अनुभूती शब्दबद्ध केलेली आहे.
जीवनाचा सारीपाट सुखदु:खाच्या धाग्यांनी विणलेला असून स्वकष्टातून उभारलेल्या ध्येयाची पूर्तता झाली की, जीवनात आनंदाचे वारे वाहतात ही वस्तुस्थिती प्रस्तुत कथासंग्रहात मांडण्यात आलेली आहे.
सद्गुणांची जोपासना, प्रेमाची सफलता, मातृपितृभक्तीचे बिजारोपण समाजात सदैव व्हावे. या मनोकामनेतून कथांचा जन्म झालेला आहे. समाजात घडणाऱ्या अनेक संवेदनशील घटना ज्या लेखकाच्या मनाला भावल्या, अस्वस्थ करणाऱ्या वाटल्या आणि प्रत्यक्ष अनुभवल्या त्याला ‘सिंहावलोकन’ या कथासंग्रहातून मोकळी वाट करून दिलेली आहे.
प्रस्तुत कथासंग्रह वाचताना स्वजीवनात डोकावल्याचा आनंद सामान्यजनांना निश्चीत मिळेल असा विश्वास वाटतो.