Summary of the Book
काळ कोणताही असो, स्त्री कोणत्याही वयोगटाची किंवा कोणत्याही नात्यातली असो, तिचा संघर्ष हा नेहमीच चाललेला असतो. कधी तो मनाशी, कधी तो नात्याशी तर कधी तो समाजाशी असतो आणि त्यातूनच तिची प्रतिमा अधिक उजळ किंवा गडद होत जाते. मात्र त्याचे पैलू हे नेहमी वेगळे असले तरीही तिच्या संघर्षांतली धार कमी होत नाही आणि तो संघर्षही कमी होत नाही. फरक झालाच तर तो केवळ संघर्षांच्या स्वरूपावर असतो, त्यातून मिळणार्या फलितावर असतो. नीता गद्रे यांनी लिहिलेल्या ‘महानगर’मधील कथाही अशाच आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील महिलांचा शहरातल्या भाऊगर्दीत होणारा संघर्ष त्यांच्या कथेतून वाचायला मिळतो. प्रत्येक वेळी स्त्री आपला संघर्ष तीव्र करताना कुठेही पराभूत होताना दिसत नाही, हेच त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. काही ठिकाणी त्यांनी विषयाला अचानक दिलेली कलाटणी त्यांच्या कथेची वाचनीयता वाढविताना दिसते. शहरात प्रथमच नोकरीच्या निमित्ताने येणारी गांगरून गेलेली तरूणी किंवा घटस्फोटामुळे हतबल झालेली विवाहिता परिस्थितीला कशी सामोरी जाते आणि ठामपणे न्यायालयात कशी उभी राहते हे वाचताना या घटना कुठेतरी आपल्या अवतीभवती कधीतरी घडल्या असाव्यात किंवा घडत असाव्यात याची जाणीव होत राहते. आपणही कधीतरी त्या कथानकाचा एखादा घटक असू अशी कल्पना आपल्या मनाला शिवल्याखेरीज राहत नाही. कदाचित लेखिकेने म्हटल्याप्रमाणे हेच या कथांचे सामर्थ्य असावे. नीता गद्रे यांचे हे सातवे पुस्तक असून त्यांच्या कथांमधील ओघवती शैली आणि लय यामुळे वाचक कथेशी पूर्णपणे एकरूप झाल्याखेरीज राहत नाही. स्त्री संघर्षांचा लढा किती अवघड आहे हेच त्यांनी या कथांमधून दाखवून दिले आहे.