Summary of the Book
ज्येष्ठ संपादक व विचारवंत श्री. गोविंदराव तळवलकर यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, पाश्र्चात्त्य व पौर्वात्य- विशेषतः महाराष्ट्रीय संस्कृती, समाज व इतिहास-कलांचा दीर्घकालीन व्यासंग सर्वश्रुत आहे. यासंबंधीचे त्यांनी संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या भरपूर लेखन केले आहे. सततचे वाचन, चिंतन व लेखन हा त्यांचा सहजधर्म झाला आहे. प्रायः ललित मासिकातील सौरभ या सदरात प्रसिद्ध झालेले त्याचे लेख प्रस्तुतच्या संग्रहात समाविष्ट केलेले आहेत.
जीवनाच्या विविध क्षेत्रांत लोकोत्तर कार्य करणार्या व्यक्तींच्या अलक्षित पैलूंसंबंधी त्यांना विलक्षण कुतूहल आहे. इंदिरा गांधी, लेनिन, गर्ट्रुड बेल, गालब्रेथ (राजकारणी); डिकन्स, गटे, मार्क ट्वेन, जॉर्ज ऑर्वेल चेकॉव्ह, आर्थर मिलर, व्हॅसिली ग्रॉसमन, थॉमस पेन, पाहमुक, उमरखय्याम (लेखक); केनान, एरिक हॉब्सबॉम, अॅलन बुलक, ह्यू ट्रेव्हर-रोपर (इतिहासकार) रामानंद चॅटर्जी (संपादक), एलिस्टर कूक (वार्ताहर), व आइन्स्टिन, डार्विन (वैज्ञानिक) यांचा अल्पाक्षरी ढंगात, आकर्षक शैलीत ते परिचय करून देण्यात इथे यशस्वी झाले आहेत.
हे लेखन जिज्ञासूंच्या ज्ञानात भर तर घालतेच, पण त्याचबरोबर त्यांना वाचनानंदही देते.
-डॉ. अनंत देशमुख