किरण शिवहर डोंगरदिवे
31/10/2020
कदाचित अजूनही स्त्रीची स्वतंत्र अस्तित्वासाठी झुंज
पुरुषाच्या कल्पनेत असते
नेहमीच एक काल्पनिक बाई...
संपूर्ण वेगळी नवे नवे देह असणारी
पुरुषाच्या मनात खरेच किती वेगवेगळ्या स्त्रियांना जागा मिळत असते. ड्रीमगर्ल हेमामालिनी पासून तर विश्वसुंदरी ऐश्वर्या पर्यंत तर कधी मारिया ते सानिया मिर्जा अशाअनेक स्त्रिया कधी पुरुषाच्या वॉलेट मध्ये, कधी मोबाईलच्या वॉलपेपर वर आपल्याला दिसत असतात मात्र त्यामागे त्यांना त्या स्त्रीबद्दल काय भावना आहे हे कुणीच विचारत नाही अगदी पत्नी सुद्धा... पुरुषाच्या कल्पनेत, स्वप्नात वेगवेगळ्या स्त्रीचा त्याला हवा तसा वावर असतो मात्र एखाद्या स्त्रीने आपल्या स्वप्नातील खऱ्या पुरुषाचे नाव किंवा चेहरा सांगितला तर... ह्या तर नंतर जी पोकळी, प्रश्न उभे राहतात त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न म्हणजे अनुराधा पाटील ह्यांचा कदाचित अजूनही हा काव्यसंग्रह आहे असे मला वाटते. खरे म्हणजे स्त्री म्हणून लिहिलेली कविता ही टोकाची स्त्रीवादी असेल पुरुषी व्यवस्थेवर टीकेचा भडिमार करणारी असेल, असा विचार करत कदाचित अजूनही हा अनुराधा पाटील ह्यांचा संग्रह वाचायला घेतला तर मनात असलेल्या कल्पनेला तडा जातो.