Summary of the Book
2003 चा उत्तम गुजराती कादंबरीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली हृदयस्पर्शी कादंबरी 'अक्षयपात्र'.
तसं पाहिलं, तर सर्व लढायांच्या मुळाशी भीतीच असते. माणसाला सर्वप्रथम जेव्हा भीती वाटली असेल, तेव्हा ह्या भीतीपोटीच त्याला शस्त्र तयार करण्याची प्रेरणा मिळाली असेल.
जिथं प्रेम असेल, विश्वास असेल, तिथंच निर्भयता असणं शक्य.
लहान लहान गोष्टींसाठी आसुसलेल्या मुलांचे डोळे आणि रिकामे हात बघायला जेवढी हिंमत लागते, त्यापेक्षा फार कमी हिंमत लागते आत्महत्या करायला !
अडचणींना तोंड देता येतं ते भावना आणि प्रेमामुळेच! बेटा, पणती असते, वातही असते; पण तेल नसेल, तर त्यांचा काही उपयोग नाही.
मी एक स्त्री आहे. एका एवड्याशा गवताच्या काडीलाही घरटं मानून जगायची शक्ती आहे माझ्यामध्ये, म्हणूनच तर निसर्गानं मला आई होऊ शकण्याचं वरदान दिलंय.
अगदी एकटं असण्याच्या ओझ्याखाली इतकं काही वाकून जायला होतं, की कधी कधी माणूस हातातलं वल्हं टाकून देतो आणि वारा नेईल तिकडे होडी जाऊ देतो; पण मग किनारा, की भोवरा ? त्याच्या हातात काहीच राहिलेलं नसतं.
अंधुक उजेडात कंचनबांना अशा उभ्या बघून वाटतच नव्हतं, की त्यांचा त्या घराशी काही संबंध होता ! त्या जणू एक अशा वृक्ष होत्या, जो उन्मळून पडला होता आणि कशाच्या तरी नाममात्र आधारानं त्याचं लाकूड उभं होतं. त्या वृक्षाला पक्कं ठाऊक होतं, की हा आधारही क्षणिक होता !