Summary of the Book
ग्रामीण कथाविषयांवर ग्रामीण बोलीभाषेतून झुलवा, खाई, चिपाड आदि कसदार कादंबऱ्या लिहून सर्वप्रिय झालेले श्री. उत्तम बंडू तुपे यांची ‘खुळी’ ही कादंबरी याच मुशीतून उतरली आहे.
देवदेवस्की, भगत यासारख्या ‘खुळा’ने पछाडलेल्या सासूने एका निरपराध सासुरवाशिणीचा कसा निर्घृणरीत्या छळवाद मांडला; आणि परिणामी तिची नावाजलेली ‘देवगुणी’ सून कशी ‘खुळी’ – वेडीपिशी झाली, याचे चित्तवेधक कथानक ग्रामीण वातावरणातील खुमासदार घटना-प्रसंग टिपून या कादंबरीत चितारले आहे.
कादंबरीची ही विलक्षण चित्तरकथा एका कुटुंबात घडत असल्याने श्री. तुपे यांनी मोजकीच पात्रे योजून आणि फापटपसारा टाळून वर्ण्य विषय वाचकाची उत्कंठा पानोपानी वाढवील इतका कसदार केला आहे.
झुलवा, खाई, चिपाड याप्रमाणेच हीही कादंबरी वाचकप्रिय होईल यात तिळमात्र संशय नाही.