Summary of the Book
शंभरी पार केलेल्या भारतीय सिनेमात तंत्रज्ञानापासून अनेक आमूलाग्र बदल झाले असून सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी वेळोवेळी त्याचा आढावा आपल्या लेखनातून घेतला आहे. ‘पार्टी’ या त्यांच्या नवीन पुस्तकातून सिनेसृष्टीचे अभिन्न अंग असलेल्या पाटर्य़ामध्येही काळानुरूप कसे बदल झाले, हे माहीत होते. फिल्मी पार्टी म्हणजे उंची मद्य, नट-नटय़ांच्या भोवतालचे चाहते आणि खुशमस्कऱ्यांचा गराडा, चमचमीत जेवण, वादविवाद, त्यातून होणारा गॉसिपचा जन्म असा सर्वसामान्यांचा समज असतो. पण या पाटर्य़ामध्ये यापेक्षाही वेगळे काही घडत असते. तेच दिलीप ठाकूर यांनी आपल्या वेगळ्या शैलीत येथे मांडले आहे.
शोमन राज कपूरच्या बंगल्यावर होणाऱ्या पाटर्य़ा, मुहूर्ताची जंगी पार्टी होऊनही पूर्ण न झालेला ‘कलिंगा’, ‘कभी कभी’ सिनेमा फ्लॉप झाल्याची (अर्थात खोटी!) बातमी कळल्यानंतर राजेश खन्नाने त्या रात्री केलेला जल्लोष.. यापासून ते मुंबईत बॉम्बस्फोट झाले असतानाही जुहूच्या हॉटेलमध्ये निर्लज्जपणे कशी पार्टी साजरी झाली, हे सर्व या पुस्तकात वाचायला मिळते. पाटर्य़ांमधील बदलांबरोबरच पाटर्य़ाचा वाढता खर्च आणि या पाटर्य़ाचे फलित याचे एक निराळेच दर्शन यानिमित्ताने घडते. सिनेप्रेमींना प्रत्यक्ष पाटर्य़ाना जाण्याची संधी मिळू शकत नाही, पण त्यातील ‘वास्तव’ जाणून घ्यायचे असेल तर ठाकूर यांच्या ‘पार्टी’ला पर्याय नाही.