Summary of the Book
‘उंच उंच झोका’ ही संघर्षकथा महिला संघाच्या स्त्री-कार्यकर्त्यांच्या अनुभवकथनांतून शोभा बोंद्रे यांनी रसाळपणे मांडली आहे. विलेपार्ले महिला संघ ही मंगलाताई भागवत यांनी आपल्या स्त्री-सहकार्यांसह १९५२ साली सुरू केलेली पार्ल्यातली एक अग्रगण्य शिक्षणसंस्था. या महिला संघाला स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर दावा मांडताना आलेले अडथळे, राजकारण, गुंडगिरी करून संघाच्या कार्यकर्त्यांना केला गेलेला छळण्याचा प्रयत्न, नोकरशहांनी कायदेशीर कामासाठी मागितलेली लाच या सर्व गोष्टी विस्तृतपणे मांडण्यात आल्या आहेत.
हे पुस्तक एका अर्थी समयोचित आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसंही- त्यातसुद्धा स्त्रीशक्ती केवढं डोंगराएवढं काम आपल्या विजिगीषू वृत्तीतून साकारू शकते, हा विश्वासही या पुस्तकानं वाचकांपर्यंत पोचेल, ही या पुस्तकाची सर्वात मोठी उपलब्धी होय.