Summary of the Book
उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक आणि समाजपरिवर्तन ,जातीअंताच्या चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्राध्यापक डॉ .मारोती कसाब यांनी २०१४मध्ये शंकर भाऊ साठे: व्यक्तित्व आणि कर्तृत्व या विषयावरील प्रबंध नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सादर करून पीएच् .डी .पदवी प्राप्त केली आहे. कसाब यांनी अतिशय दुर्लक्षित ,आजवर अदखलपात्र राहिलेल्या लेखकाच्या साहित्याचा अतिशय सखोल अभ्यास आपल्या शोधग्रंथातून केला आहे. या प्रबंधाची मांडणी ही एरव्हीच्या औपचारिक संशोधनाला छेद देणारी असून , या लेखनाला पदवीपलिकडचे व्यापक उद्दिष्ट आहे . पदवीसाठी करण्यात येणाऱ्या संशोधनाच्या चौकटीबाहेर जाऊन आणि प्रचलित संशोधन पद्धतीचे निर्बंध ,संकेतांना नकार देतच हे लेखन झालेले असल्यामुळे हा प्रबंध सद्यस्थितीत वेगळा ठरावा.
शंकर भाऊ साठेंच्या साहित्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने प्रा.कसाब यांच्या या ग्रंथामुळे अण्णाभाऊ व शंकरभाऊ यांच्यासंबंधी अधिक प्रगल्भ संशोधनाची सुरवात झाली ही खूपच सुखावणारी बाब आहे. म्हणून या पुस्तकाचे सर्वानीच मनःपुर्वक स्वागत केले पाहिजे ,तसे ते होईलच याची खात्री आहे.