Summary of the Book
राज्याचे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी व सभोवतालच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी किल्ले बांधले जात. भारतात प्राचीन काळापासून दुर्ग बांधण्याची कला अवगत आहे. शिवाजी महाराज व किल्ले यांचे अतूट नाते तर प्रत्येकाला माहीत आहे.
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्याने या डोंगरी किल्ल्याला मोठे महत्त्व आले; पण या किल्ल्याबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नाही. ही उणीव डॉ. लहू कचरू गायकवाड यांनी भरून काढत शिवनेरीचा इतिहास, भूगोल, 'शिवनेरी जीवनगाथा 'मधून सांगितला आहे.
शिवनेरी जसे शिवरायांचे जन्मस्थान आहे, तसेच सातवाहन घराण्याची सत्ता महाराष्ट्रात असताना हा किल्ला बौद्ध धर्माचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होता. याच काळात जुन्नरची मोठी भरभराट झाली होती. या परिसरातील ३५७ लेण्यांपैकी ७८ लेण्या, विहार, पाणपोढ्या, शिलालेख शिवनेरी किल्ल्यामध्ये आहे. त्याविषयी व यादव, मध्ययुगीन व मोगलांच्या काळातील शिवनेरीची माहिती पुस्तकात आहे.
शिवनेरीचे भौगोलिक स्थान, प्राचीन जुन्नर - शिवनेरी, शिवनेरी दर्शन, इंग्रजांच्या काळात या किल्ल्याचे स्थान, परिसरातील लेणीसमूह याबाबतचे संशोधनात्मक लिखाण यात वाचायला मिळते. किल्ल्याच्या अप्रकाशित अस्सल कागदपत्रांचा यात समावेश केला आहे.