Summary of the Book
सूफी पंथ मराठवाडयाच्या मातीशी एकरूप झालेला एक महत्वाचा भक्तिपंथ. परमेश्वरप्रीती आणि मानवी जीवनाविषयीचे चिंतन सूफींनी केलेल्या रचनेतून अभिव्यक्त झाले आहे. या समद्ध परंपरेची तोंडओळख सेतुमाधवराव पगडींसारख्या अभ्यासकाने मराठी वाचकांना करून दिली आहे. देवगिरीच्या परिसरातील सूफी संत आणि मराठवाडयातील सूफी संतांची ओळख यांचा विस्तृत अभ्यास मांडण्याचा प्रयत्न डॉ. शेख एजाज यांच्या या ग्रंथातून साकारला आहे. सूफींचे तत्वज्ञान आणि भारतीयांचे तत्वज्ञान यांचा तौलनिक विचार, योग्य दिशेने चिंतन करून मिळविलेले ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची संकल्पना इस्लामच्या धर्मशिक्षणाशी निगडीत आहे. सूफींनी दिलेली शिकवणही या संकल्पनेशी नाते सांगणारी आहे.
मदरसे, खानखाही, शिक्षणपद्धती, सूफी संतानी साधकांना दिलेली शिकवण, सूफी मत यासंबंधीचे विस्तृत विवेचन या ग्रंथाचा विशेष ठरला आहे. हिंदी, उर्दू, इंग्रजीच्या तुलनेत सूफीसंबंधीचे लेखन मराठीत खूपच कमी आहे. मध्ययुगीन काळापासून सूफींच्या शिकवणीची मराठवाडयाशी बांधलेल्या घट्ट धाग्यांची वीण या ग्रंथातून स्पष्ट होते.
संशोधकाच्या भूमिकेतून महत्वाच्या विषयाला परंपरेचे नवे भान देत मांडणी केली आहे. मराठी संतपरंपरा आणि सूफी संतपरंपरा यांच्या तौलनिक अभ्यासाला हा ग्रंथ उपुक्त ठरणार आहे. डॉ. शेख एजाज यांच्या ग्रंथाचे मोल याही कारणाने मला महत्वाचे वाटते. भविष्यातही त्यांनी या विषयासाठी आपले योगदान व्यापक स्वरुपात द्यावे एवढया अपेक्षा या ग्रंथाने निर्माण केल्या आहेत.