Summary of the Book
पुस्तकामध्ये काही कथा आहेत आणि दोन लेख आहेत. त्या दोन्ही लेखांचा कथासंग्रहात समावेश केला आहे, कारण एक लेख तर त्यांच्या 'मुखवटा' कादंबरीची जन्मकथाच आहे. दुसरा लेख त्यांच्या दोन सुहृदांचं शब्दचित्र आहे. परंतु मी त्या लेखाला तीन मित्रांची गोष्ट असचं म्हणतो. प्रथितयश संपादक अरुण टिकेकर आणि कुमार केतकर आणि तिसरा मित्र म्हणजे स्वतः अरुण साधू. आपल्या दोन्ही मित्रांच्या कर्तृत्वाचा परामर्श घेता घेता साधूंच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे इतके पैलू त्या कथेत आले आहेत की, तो लेख दोन मित्रांबद्दल न राहता तीन मित्रांची कहाणी बनला आहे. साधूंनी स्वतःबद्दल कुठेही कधी विशेष लिहिलेलं नाही इतकं त्यांच्या वैयक्तिक स्वभावाचं दर्शन त्या लेखात पाहावयास मिळते. शिवाय, या लेखाची खास गोष्ट म्हणजे विनोदी शैलीमध्ये लिहिलेला हा त्यांचा एकमेव लेख असावा.