Summary of the Book
वस्तुनिष्ठ कार्यप्रवणता पत्रकारितेच्या क्षेत्रात जवळजवळ अडतीस वर्षं गेली. हा काळ गोड, कडवट अनुभवांचा काळ. समाजजीवनात एक पत्रकार म्हणून वावरत असताना अनेकांशी संबंध येतो. ती अपरिहार्यता असते. भेटलेली माणसं सगळीच वाचता आली नाहीत. चार भिंतींच्या मर्यादित जगात वावरणे कधीच जमले नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, नाट्य, संगीताच्या क्षेत्राशी असलेल्या जवळिकेमुळे सेवाभावी, कर्तृत्वसंपन्न आयुष्य सार्थकी लावलेली माणसं भेटली. नाकर्ती व कर्ती यांच्यातील फरक समजून घेतला. समाजातील व अशा व्यक्तींमधील अंतराचा शोध घेतला. त्यातूनच महाराष्ट्रातील काही आमदारांच्या कार्याची ओळख करून देण्याची इच्छा झाली. लोकप्रतिनिधींची प्रत्येकाच्या मनात वेगळी प्रतिमा असते.
सांगीवांगीच्या गोष्टींवर तयार झालेली. सगळेच काही नकारात्मक नसते. स्वकर्तृत्व, स्वप्रयत्नांचा मार्गही शोधायचा असतो. सगळ्यांना एकाच मापात मोजणे हा लोकशाहीचा अपमान ठरेल असे वाटले. अनेक आमदारांशी या ना त्या कारणाने गाठीभेटी झाल्या. संवाद झाला. विधानभवनातील, मंत्रालयातील व जनतेतील त्यांचा वावर पाहिला. कामाचा उरक लक्षात आला. एखाद्या प्रश्नात शिरून खोलवर म्हणजे अगदी तळापर्यंत जाऊन घेतलेला वेधही अभ्यासता आला. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा अंदाजही घेतला. 'लौकिक' त्या अर्थाने काही काळाचे राजकीय दर्शन आहे.
त्याकडे समाजशास्त्र म्हणून पाहिले जावे. व्यक्ती, संबंध आणि व्यवहार ह्यांची जंत्री म्हणजे हे पुस्तक नव्हे. या चमत्कारिक गोष्टीही नाहीत. आहे तो कार्यप्रवणतेचा मनाला भावलेला आलेख.
इतकेच अन् एवढेच !