Summary of the Book
वारकरी पंथातील आद्य कीर्तनकार म्हणून संत नामदेव यांचा गौरव करीत दीपक नीलकंठ बीचे यांनी 'संत शिरोमणी बाबा नामदेव' या ग्रंथातून नामदेव महाराज यांचे चरित्र लिहिले आहे. भागवत धर्माच्या शिकवणीतून मानवता व समतेचा जागर नामदेव महाराजांनी केला. महाराष्ट्रातून उत्तर भारतात प्रवास करीत त्यांनी पंजाबात भागवत धर्माची पताका फडकावली.
आद्य चरित्रकार, फडकरी, आद्य प्रवासवर्णनकार, प्रतिभाशाली कवी, पुरोगामी विचारवंत, कृतीशील धर्मप्रचारक, वारकरी संप्रदायाचे प्रणेते, साक्षेपी प्रचारक, भाक्तीत्वाचे भाष्यकार, श्रेष्ठ संत असे नामदेवांचे अनेक गुण सांगून लेखकाने त्यांचे चरित्र समोर ठेवले आहे.
नामदेवांच्या जन्मापासून त्यांचा बालपणीचा काळ, गुरु विसोबा खेचर यांच्यामुळे निर्माण झालेली ज्ञानभावाची स्थिती कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संत ज्ञानेश्वर, जनाबाई, सावता माळी गोरोबा कुंभार, चोखा मेळा यांची चरित्रे लिहिणारे नामदेव महाराज, स्त्री समानता पुरस्कार, कबीर व नामदेवांची भेट, ज्ञानेश्वर व नामदेवांमधील सख्य, नामदेव व संत तुकाराम, नामदेव महाराज व शीख धर्म अशा सर्व गोष्टींमधून लेखकाने संत नामदेवांची महती, कार्यकर्तुत्व यात सांगितले आहे.