Summary of the Book
सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांमध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेल्या भृगु ऋषींची केवळ पौराणिकच नव्हे तर, आज जगात इतस्तत: विखुरलेल्या भृगुकुलोत्पन्नांची साधार व अभ्यासपूर्ण माहिती प्रा. यंगलवार यांनी या पुस्तकात दिली आहे. महर्षी भृगुंच्या जन्माच्या विविध कथा, त्यांचे पौराणिक दाखले, त्यांचा कुलविस्तार, त्यांचे कार्य, त्याचे आध्यात्मिक, सामाजिक महत्व अशी चौफेर माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. सामान्यत: वाचकांना महर्षी भृगुंच्या भृगुसंहिता या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथाचीच माहिती असलेली आढळते. मात्र महर्षी भृगु यांनी ऋग्वेद, अथर्ववेद यांच्यावर केलेले विपुल लेखन, वास्तुशास्त्र, आयुर्वेदसंहिता, भृगुस्मृती, वेदान्तावरील भृगु-गीता आदींचाही परिचय या पुस्तकात लेखक प्रा. यंगलवार यांनी करून दिला आहे. महर्षी भृगु यांच्याशी संबंधित भारतातील प्रमुख स्थाने आणि तेथे होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही लेखकाने रोचकपणे दिली आहे.