Summary of the Book
मिलिंद गुणाजी यांची अभिनेता म्हणून जशी ओळख आहे, तशीच देशाच्या अनेक भागांत फिरलेले जाणते पर्यटक म्हणूनही त्यांची एक ओळख आहे. या वेगळ्या आकाराच्या पुस्तकात त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर विमानातून केलेल्या छायाचित्रणाचे किस्से सांगितले आहेत. यातील छायाचित्रं ठाकरे यांनी काढलेली आहेत. पण, या सफरीतील अनेक प्रसंग आणि थरारक क्षण गुणाजी यांनी इथं ओघवत्या भाषेत सांगितले आहेत. त्यामुळं सुंदर चित्रं आणि चांगला मजकूर, असा संगम इथं झाला आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या हवाई छायाचित्रणानिमित्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ठेव्याच्या ‘याचि देही याचि डोळा’ घेतलेल्या अद्भुत दर्शनाचं हे सचित्र कथन. या प्रवासात कधी भौगोलिक ज्ञानाची कसोटी लागते, कधी मजेशीर प्रसंग हसवून लोटपोट करतात, कधी जिवावर बेतणारं साहस नि:शब्द करतं तर कधी निसर्गच काव्यरूप धारण करुन समोर ठाकतो! एक कवी मनाचा संवेदनशील लेखक आणि एक प्रतिभावंत छायाचित्रकार यांच्या संयुक्त आविष्कारातून साकारलेली ही सुंदर, विहंगम अशी हवाई मुलुखगिरी!