Summary of the Book
सामाजिक वास्तवातून माणसाच्या वाट्याला येणारी परात्मता (एलिअनेशन) आणि त्याची निसर्गदत्त मानवीयता यांच्यातील संघर्षाचे करुण-भीषण नाट्य या कादंबरीत चितारले जाते. मनोहर तल्हार ‘माणूस’ मध्ये सामाजिक-आर्थिक नियतत्ववादाचे (सोशिओ-इकॉनॉमिक डिटर्मिनिझम) कलात्मक चित्रण करतात. आत्मकरुणा, भावुकता, अथवा प्रचारकी संकेतिकता ह्या दोषांना कुठेही बळी न पडता एका श्रेष्ठ सामाजिक कादंबरीचे लेखन केले जाते. टॉलस्टॉय, चेकोव्ह, तुर्गेनेव, डोस्टोवस्की किंवा गोर्की यांच्या पंक्तीत शोभून दिसावी एवढ्या तोलाची ही कादंबरी. थोर रशियन कलावंतांप्रमाणेच तटस्थपणे, अलिप्तपणे, दयाबुद्धीच्या आहारी कुठेही न जाता, आणि तरीही अतीव सहानुभूतीने रंगविलेले ‘माणूस’ मधील नागर श्रमजीवी समाजाचे चित्रण आपल्याला हादरवून टाकते; अस्वस्थ करून सोडते. आपल्या कलात्मक जाणिवांबरोबरच सामाजिक जाणिवांचे क्षितीज फार मोठ्या प्रमाणात विस्तारले जाते.