Summary of the Book
श्री. सुहास गोविंद नाईक तथा नामदास यांच्या श्रीमत गुरुचरित्र - एक उत्कंठावर्धक शोधयात्रा (दिव्य दर्शन) या ग्रंथाचे प्रकाशन विद्यावाचस्पती डॉ. सौ. कल्याणी नामजोशी यांच्या शुभहस्ते झाले. या ग्रंथास प. पू. सदगुरु श्री. विद्याधर हरि गुर्जर यांची प्रस्तावना लाभलेली असून त्याद्वारे या ग्रंथाची अत्यंत सूक्ष्मतेने चिकित्सा घडली आहे. वाचकांना ती निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
आजपर्यंत श्रीमत गुरुचरित्रावर असंख्य लिखाण झाले असून त्यात त्यातील कथा, त्याचे व्यावहारिक विश्लेषण, साधकांना आलेले विविध अनुभव व अनुभूती तसेच यातील कथांचे काव्यात्मक अवतरण या अनुषंगाने अनेक बाबींचे उलगडे झालेले असून ते भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेय बनलेले आहेत.
प्रस्तुतच्या ग्रंथाद्वारे लेखकाला घडलेले दिव्य दर्शन हे परंपरागत उलगडण्यापेक्षा पूर्णपणे वेगळेच असल्याने ते अनोखे दिव्य दर्शन आहे. कोणत्याही मार्गाच्या समर्पित साधकांना त्यांच्या साधानाप्रवासात अनुभवास येणाऱ्या निरनिराळ्या अवस्थांचे, स्थित्यंतराचे व शुद्धीकरण प्रक्रियांचे 'गुह्य' श्रीमत गुरुचरित्रातील प्रत्येक गोष्टीत क्रमवार दडलेले असून कैवल्यावस्थेपर्यंतच्या उत्क्रांतीचा प्रवास त्यात गुंफलेला आहे.
लेखकाद्वारे तो प्रवास, सदगुरुंच्या अवतरणानुसार, अत्यंत सोप्या शब्दात, योग्य त्या रुपकांद्वारे, विवेचित झालेला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने चिंतनाने व सर्वंकष अभ्यासाने साधकांना आपण नेमके कोठे आहोत याचा उलगडा तर होईलच पण त्याहीपेक्षा पुढील मार्गक्रमण करण्यासाठी यथोचित बळ, संम्यक ज्ञान व सहनशक्ती याची शिदोरी प्राप्त होईल याचा भरवसा वाटतो. म्हणूनच हे सदगुरुकृपेने अवतरलेले दिव्य दर्शन आहे. हा ग्रंथ अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर यांचेद्वारा प्रकाशित झालेला आहे.
-सुहास गोविंद नाईक तथा नामदास