Summary of the Book
रांगोळी हे पावित्र्याचे प्रतिक समजले जाते, त्यामुळेच कोणत्याही शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची प्रथा भारतात आहे. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतिमा व काही भौमितिक आकृत्या रांगोळीतून रेखाटल्या जात असे.
कालांतराने त्यात ठिपके, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र असे बदल होत गेले. कलेचा एक भाग असलेल्या रांगोळीच्या इतिहासाचा शोध डॉ. नयना तडवळकर यांनी 'रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध'मधून घेतला आहे. रांगोळीचा उगम आणि प्राचीनता प्रागैतिहासिक अश्मचित्रांपर्यंत जाऊन पोचतो. सिंधू संस्कृती, आर्यपूर्व ते आर्यसंस्कृती आणि नंतरचा काळ, आदिवासी संस्कृतीतला रांगोळीचा इतिहास मांडला आहे.
रांगोळीचे विविध पैलू उलगडताना देशाच्या विविध प्रांतातील, समाजातील रांगोळीची वैशिष्ठे, पश्चिम व दक्षिण भारतात रांगोळी काढण्यामागचे संकेत स्पष्ट करताना गुजरातमधील 'साथिया', तामिळनाडूतील 'कोलम' आंध्रातील 'मुग्गुल', पारशी 'चॉक', जैनांची रांगोळी, महाराष्ट्रातील रांगोळी, पाठारे प्रभूंची रांगोळी, संस्कारभारतीची रांगोळीची माहिती दिली आहे.
रांगोळीचे साहित्य व प्रतीके, विदेशात रांगोळीचे अस्तित्वाची दखलही घेतली आहे. याशिवाय रांगोळीच्या रेखाटनांमुळे पुस्तकाला शोभा आली आहे.