Summary of the Book
वाचकांचा अनुनय न करता त्यांच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावणारा यंदाचा मौज दिवाळी अंक त्याच्या नेहमीच्या लौकिकाला साजेसाच भारदस्त आहे. यातला ‘बदलता समाज, संगीत कला आणि कलाकार’ या विषयावरील समीर दुबळे, शुभा मुद्गल, अनीश प्रधान, चैतन्य कुंटे, राजेंद्र मणेरीकर आणि शशी व्यास यांचा सहभाग असलेला परिसंवाद एका वेगळ्याच विश्वाचे अंतरंग उघड करतो.
ज्येष्ठ समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी (नरेंद्र चपळगावकर) आणि साहित्यिक कुसुमाग्रज (रामदास भटकळ) यांच्यावरचे आठवणीवजा व्यक्तिचित्रणपर लेख, वसंत आबाजी डहाके यांनी मांडलेली कवितेच्या समीक्षेबाबतची भूमिका, ओसामा बिन लादेनच्या हत्येसाठी अमेरिकेने वापरलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा बाळ फोंडके यांनी घेतलेला ललित वेध, त्याचप्रमाणे श्रीराम शिधये, विनया जंगले, अंबरीश मिश्र यांचे वैविध्यपूर्ण लेख, रत्नाकर मतकरींनी आपल्या नाटकांचा रेखाटलेला लेखक-दिग्दर्शकीय प्रवास, वृदांवन दंडवते यांनी अराबाल या लेखकाच्या एकांकिकेचे केलेले स्वैर रूपांतर, प्रभाकर कोलते यांनी मोहन सामंत या वेगळीच प्रतिभाशक्ती लाभलेल्या चित्रकाराच्या चित्रशैलीची केलेली चिकित्सा, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आपल्या एका अमूर्त शैलीतील चित्रनिर्मितीचा कथन केलेला प्रवास, ब्रिटिशकालीन चित्रकार विल्यम होजेस यांनी भारतातील निसर्गाबद्दल वाटणारी ओढ आपल्या चित्रांतून कशी व्यक्त केली याचा विजय तापस यांनी परामर्ष घेतलेला आहे.
सानिया, अनिल अवचट, वि. ज. बोरकर, हेमंत देसाई यांचे वैविध्यपूर्ण लेख, मधु मंगेश कर्णिक, विजया राजाध्यक्ष, भारत सासणे, संजीव लाटकर यांच्या कथा आणि मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, ना. धों. महानोर, ग्रेस, सतीश काळसेकर, गुरुनाथ सामंत, वसंत पाटणकर आदी ज्येष्ठांबरोबरच नव्या दमाच्या कवींनी कविता विभागात लावलेली हजेरी ही या अंकाची वैशिष्टय़े आहेत. बाळ ठाकूर, चंद्रमोहन कुलकर्णी, भ. मा. परसावळे या चित्रकारांनी ‘मौज’च्या सौंदर्यपूर्णतेत भर घातली आहे.