विद्यापीठीय संशोधनाला दर्जा राहिला नाही, याबद्दल सध्या चिंता व्यक्त केली जाते; मात्र संशोधनाचा दर्जा सुधारावा यासाठी अपेक्षित दिशा देणारे सूत्रबद्दध असे विवेचन नव्या संशोधकासमोर ठेवले जात नाही. मराठी साहित्य संशोधनासंदर्भातील ही उणीव डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘साहित्यसंशोधन : वाटा आणि वळणे’ या पुस्तकाच्या रूपाने भरून काढली आहे. पदवीच्या संशोधनाच्या लेखनपद्धतीतील पारिभाषिक संकेत व बारकावे स्पष्ट करून या पुस्तकातून त्यांनी साहित्यप्रकारनिहाय संशोधनाचे स्वरूप कसे असावे याचे दिशादर्शन केले आहे. मध्ययुगीन वाङ्मयाच्या आणि लोकसाहित्याच्या संशोधनाचेही स्वरूप, दिशा आणि तंत्र या ग्रंथातून मांडले गेले आहे. मराठी साहित्य आणि सामाजिक शास्त्रे यांचा अनुबंधही स्पष्ट केला आहे. संशोधनपर लेखनाचे स्वरूप स्पष्ट करताना ग्रंथकर्त्याने चिकित्सक, विवेचनात्मक, निवडक, तौलनिक आदी पायाभूत अभ्यास याचा परामर्श घेऊन नवसंशोधकांना मार्गदर्शन केले आहे. लेखनातील शब्दसुसंगती, वाक्यरचना, प्रयोग, काळ, परिच्छेदरचना, प्रास्ताविक, समारोप ते अगदी प्रबंधाचे टंकलेखन आणि मुद्रितशोधन या बारीकसारीक बाबींसंदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी, यासंबंधीचे मार्गदर्शनही या ग्रंथात केले आहे.
‘साहित्यसंशोधन : वाटा आणि वळणे’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4803336671336208882