Summary of the Book
काही स्वत:चे अनुभव आणि काही सहवासातल्या व्यक्ती यांच्याविषयीचे हे लेखन. म्हणून डॉ. आनंद नाडकर्णी या संग्रहाला ललितलेखसंग्रह म्हणतात. मितुले’ हा शब्द ज्ञानेश्वरीतला. त्याचा अर्थ मोजका. त्याला लेखकाने रसाळ’ची जोड दिली.
यात एकंदर एकवीस लेख आहेत. पहिलाच लेख फर्डा वक्ता ते प्रांजळ निरूपण : एक प्रवास’ शीर्षकानुसार लेखकाच्या व्यासपीठावरून बोलण्याचा स्थूल आढावा घेणारा आहे. दुसरा लेख कधीकाळी लिहिलेल्या स्वत:च्याच कवितेची गोष्ट सांगतो. तिसरा लेख दोन क्रीडापटूंना मार्गदर्शन करत आत्मविश्वास देणारा आहे. माझा उमदा मित्र’ हा लेख एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयीच्या आठवणी जागवणारा आहे. त्यातून करकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अज्ञात पैलू जाणून घेता येतात. सुनंदा अवचट यांचेही व्यक्तिचित्र माझी आई-मैत्रीण’ या लेखात रेखाटले आहे. यातील सर्वच लेख प्रसंगपरत्वे लिहिले गेले आहेत.
यातील जवळपास सर्वच लेख चार-पाच पानांचे, म्हणजे तुलनेने लहान आहेत. त्यामुळे ते फटकन वाचून होतात. साधी सोपी भाषा आणि सहजसाधे विषय, असे एकंदर या पुस्तकाचे स्वरूप आहे. एखाद्या डॉक्टरने रुग्णाला समजावून सांगावे, त्या पद्धतीने लेख लिहिलेले असल्याने हे पुस्तक वाचनीय झाले आहे.