Bookbandhu_Reviews (Omkar Bagal)
20/01/2025
जिप्सी - केतन माणगांवकर
पुस्तक परीक्षण/ Book Review - ओंकार बागल
'जिप्सी'...तसा गुगल वर जिप्सीचा अर्थ a free spirited person असा दिला आहे. आणखी सांगायला गेलं तर जिप्सी म्हणजे एखाद्या न संपणाऱ्या प्रवासाला निघालेले लोक जे कुणाचेही नाहीत आणि ज्यांचं कुणी नाही. किती नवल आहे या गोष्टीची, नाही का? म्हणजे बघायला गेलं तर जिप्सी कोण नाहीये या जगात? आपण सर्वचं कुठल्या ना कुठल्या प्रवासाचा एक भाग आहोत किंवा कुठलातरी प्रवास करत आहोत. फरक इतकाच ते आपल्याला कळत नाही अथवा कळलं तरी वळत नाही. सर्वांच्याच आयुष्यात लोकं येतात, जातात, काही लोकं जगण्याचा एक भाग बनून राहतात; परंतू कुणाच्याच आयुष्यात, कुणीच कायमस्वरूपी असण्याची शाश्वती कधी नसतेच मुळी. आपण सर्वजण एकमेकांच्या जगण्याचा भाग बनून जगत असतो, फिरत असतो, काहीतरी धुंडाळत असतो. त्यामुळे एका अर्थाने, आपण सर्वचं कळत नकळत जिप्सीचं असतो असंही म्हणता येईल.
याच आशयावर लेखक केतन माणगांवकर यांनी 'जिप्सी' ही कादंबरी लिहिली आहे. पुस्तक हातात पडलं तसं वाटलं, कदाचित यात बस्स एखादी कथा असेल, प्रवास असेल, थोडंफार वर्णन असेल. फिरस्त्याने अनुभवलेल्या गोष्टी सांगितल्या असतील. मात्र जस् जशी या कादंबरीतील एक एक गोष्ट उलगडत जाते तस् तसा कहाणीला बहार येत जातो. ही कादंबरी खरं तर एका फिरस्त्याचीचं मात्र त्यात पैलू खूप आहेत. प्रथम म्हणजे या विषयाकडे एका वेगळ्या नजरेतून पाहून कादंबरी लिहिली गेली ही अतिशय सुंदर गोष्ट. शिवाय या कादंबरीची भाषा अगदी सोप्पी आणि चटकन समजेल अशा स्वरूपात असल्याने ती आणखी एक जमेची बाजू. तिशीतील प्रत्येक तरुणाला ही कहाणी आपलीच आहे, असं वाटून जाईल कारण या वयात प्रत्येक तरुण बंडखोर प्रवृत्तीचा बनलेला असतो. इथे बंडखोरचा अर्थ म्हणजे घरापासून लांब जाऊन स्वतःच्या अस्तित्वाच्या शोध घेण्याचं धाडस करणारा व्यक्ती असा आहे.
ही कादंबरी काहीशी अशीच. घरापासून बाहेर पडलेल्या एका तरुणाची. त्याला आलेल्या अनुभवांची, जाणिवांची, स्व:त्वाची आणि थोडंसं उशिरा उमगलेल्या अंतर्मनातील ब्रह्मंडाची. कादंबरीतील या मुख्य पात्राची गंमत अशी आहे की तो दिशाहीन भटकत असला तरी त्याला त्याच्या प्रवासात भेटलेल्या सर्व लोकांना त्यांची दिशा आणि त्यांचं अंतिम ध्येय माहित आहे, असं वाटतं राहतं. मात्र खरं पाहायला गेलं तर तो स्वतः त्याच्या योग्य दिशेने मार्गस्थ असून त्याला भेटलेली लोकं त्यांची वाट चुकलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक जण आयुष्यात चुकत असतो, भरकटत असतो, हेच तर आयुष्यातलं खरं कोडं आहे जे आपण सोडवत असतो, याची जाणीव वाचताना क्षणोक्षणी होत राहिलं. बारकाईने पाहिल्यास आपल्या आयुष्याचीसुद्धा अशीच गंमत चालू असते, केवळ ती ओळखता आली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे. कादंबरीतील एक एक पात्र जणू काही लेखकाने वेचून घेतल्यासारखे वाटतात. एकापेक्षा एक सरस पात्र आणि त्यांच्या विविधांगी गुणधर्मामुळे कादंबरीला आलेली खमंग चव वाचणाऱ्याला चटकदार वाटते.
अक्षरशः ढाब्यावर भेटलेल्या बांग्लादेशी रिव्हर जिप्सीपासून ते टाकीवरच्या म्हाताऱ्या बाबापर्यंत प्रत्येक पात्राची स्वतःची एक वेगळीच कथा आहे. विविध लोकांचे विविध अनुभव, त्यांच्या जगण्यातले क्षण, चांगल्या-वाईट गोष्टी अशा खूप साऱ्या मजेशीर गोष्टी आहेत. माणूस एकमेकांकडून कळत नकळत कशाप्रकारे शिकून जातो, याची बरीच उदाहरणे वाचायला मिळतात. लेखकाने या कादंबरीत फ्लॅशबॅक्स अतिशय रंजक पद्धतीने गुंफलेले आहेत. जसे की आजीच्या लहानपणीच्या गोष्टी, बापाचं वारंवार ओरडणं-रागावणं, कॉलेजमधल्या खानविलकरच्या सुखद आठवणी, गिटार शिकताना घडलेला प्रसंग व त्यातून निर्माण झालेला न्यूनगंड आणि अशा बऱ्याच गोष्टी. वाचणारा एका क्षणात काही वर्षे मागे खेचला जातो तर पुढच्या क्षणात पुन्हा वर्तमानात येऊन ठेपतो, जणू काही घडलचं नसावं.
कादंबरीत नमूद केलेला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील पुरातत्व विषयाचा अभ्यास. भारतात अशी खूप सारी ठिकाणे आहेत, ज्यांचा पुरातत्व विषयाचा अनुषगांतून अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी बाहेरच्या देशातून येतात. अशाप्रकारच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रातसुद्धा प्राचीन मंदिरे, वास्तू, ठिकाणे आहेत ज्यांचा उल्लेख आणि महती या पुस्तकातून वाचायला मिळतात. कादंबरीतील आणखी काही बारकावे म्हणजे लेखकाने पात्रांना दिलेली नावे खरंच खूप गंमतीदार आहेत.
आपली भारतीय प्राचीन संस्कृती आणि शिक्षणपद्धती किती प्रगत होती याचं एक उत्तम उदाहरण या कादंबरीतून वाचायला मिळतं ते म्हणजे मावळता सूर्य आपल्याला अचूक वेळ सांगतो. स्थापत्यशास्त्र, पुरातत्वशास्त्र, खगोलशास्त्र इ. विषयांचा आपला अभ्यास किती गाढा होता, हेसुद्धा वाचताना समजून येतं. याशिवाय कादंबरीतून अनेक महत्वाचे विषय समोर येतात. बांग्लादेशी लोकांचं स्थलांतर, विदेशी विद्यार्थ्यांचा भारतीय पुरातत्वशास्त्रचा ओढा, तीन पिढ्यांतील पुरुषांचं एकमेकांशी असलेलं बंध, लहान वयात निर्माण झालेला न्यूनगंड, परिस्थितीने दिलेले धक्के, कॉलेजलाईफ आणि त्याच्या आठवणी, ख्रिश्चन मिशनरीचे काम, शहरांपासून विभक्त जगत असलेली गावे, मंडेला इफेक्ट्, फिडेल कॅस्ट्रोच्या मार्गावर चालणारे लोकं, शिक्षणाचं महत्त्व इ. एका मुलाच्या आयुष्यात मुली कशाप्रकारे येतात, त्यांचा मुलांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, त्यानुसार गोष्टी कुठून कुठे जाऊ शकतात. खरंतर हे एकप्रकारचं वेगळं नातं असलं तरी वाढत्या वयानुसार त्या कशाप्रकारे आणि कितपत बदलत जातं याविषयी बऱ्याच गोष्टी कादंबरीतून उलगडत जातात. थोडंसं आणखी निक्षून पाहिल्यास जिप्सी म्हणजे कस्तुरीमृगासारखा आहे, खुद्द स्वतःकडे सुगंध असूनही सुगंधाच्या शोधात धावत सुटलेला, सैरभैर झालेला आणि आपलीही गत अशीच आहे..कस्तुरीमृगासारखी..जिप्सीसारखी!
'तूज आहे तुजपाशी, तरी तू भुललासी' या उक्तीला साजेशी अशी ही कादंबरी म्हणजे माणसाच्या आयुष्यभराच्या प्रवासाची कहाणी. मोजक्या आणि तितक्याच रंजक शब्दांत सांगून जाणारी ही कादंबरी प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते.