Summary of the Book
व्यंकटेश माडगूळकर, शंकराव खरात, उत्तम बंडू तुपे, लक्ष्मण माने, मेघा पाटील, नवनाथ गोरे, कैलास शिंदे अश्या अनेक साहित्यिकांच्या साहित्यात माणदेशचा प्रदेश चित्रित झालेला आहे.
पशुपालन भटक्या जमातींचा ऊन,वारा, पाऊस आणि अंधश्रध्दा, अज्ञान यांच्यासह जीवन प्रवास ही ओळख आहे. अभावग्रस्ततेत तग धरून राहण्याची जन्मजात मिळालेली बाळगुटी. शेळ्या, मेंढ्या, गाई गुरे हे कुटुंबातील घटक. सातत्याने दुष्काळ. जनावरे, माणसाच्या पोटासाठीची भटकंती ही माणदेश ची अविभाज्यता राहिली आहे.
नागू वीरकर यांची ' हेडाम ' हीच परपरा अधिक ठळक करणारी आहे तशी या परंपरेतील माणदेश च्या अभावग्रस्ततेला छेद देणारी, लोकसांस्कृतीक परीघ विस्तारणारी, शिक्षणाने एकूण जगण्यात परिवर्तनाचे पडसाद ठळक करणारी, अस्सल माणदेशी लोकभाषेचा ऐवज लेवून, मेंढ्या गुरांसह माणसाच्या जगण्यातील बदलत्या अस्तित्त्ववाची नोंद करणारी ही कलाकृती आहे.
शेरडा मेंढरांच्या कळपाबरोबर आपले आयुष्य घेऊन फिरणाऱ्या नागु या धनगराच्या मुलाची कहाणी सर्व पशुपालक आणि स्थिर, सुस्थितीत जीवन जगणाऱ्यांना प्रेरणा देणारी आहे.
ही कथावस्तू बहुकेंद्रीय आहे. धनगर समाजाचा विविध टप्प्यावरचा प्रवास यामध्ये वाचावयास मिळतो. यामध्ये मेंढपाळाचे जीवन आहे. त्याच्या मुलाचे शिक्षण आहे आणि शिक्षण घेत असतानाची अडथळ्याची शर्यत आहे. या तीन टप्प्यावर धनगर समाज आणि पशुपालक जीवनाची व्यामिश्रता समजून घ्यावी लागते.
एका अर्थी लेखकाचे हे आत्मनिवेदन आहे. तसेच ती एक कादंबरी आहे. म्हणून या साहित्यकृतीला आत्मचरित्रात्मक कादंबरी असे म्हणता येईल. ही कथा नागु या व्यक्तीच्या जगण्याची आहे. माणदेश आणि मानदेशच्या परिसरातील अनेक गाव खेड्यांची तेथील माणसांची जनावरांची आहे. जरी कथेचा नाही एक असला तरी प्रत्येक व्यक्तीची ती कथा आहे. लेखकाने माणदेशातील आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींची विलोभनीय अशी व्यक्ती चित्रने रेखाटलेले आहेत. ती त्यांच्या जगण्यासह,त्यांच्या असण्यासह लेखकाला भावलेली आहेत. या व्यक्तिरेखांचे वेगळे विशेष असलेले जाणवतात. म्हणून ही नागू विरकर यांची व्यक्तिचित्र नाही असा उल्लेख करणे संयुकतिक ठरेल.
आटपाडी, महूद, जत, उमदी, सांगोला, फलटण, बारामती,नातेपुते, शिखर शिंगणापूर, सातारा, खटाव, हा प्रदेश मराठी साहित्यात आलेला असला तरी भटकंतीचा व्यापक पट दापोली,धूळदेव, म्हसवड, कारखेल, सोलापूर,बार्शी, पंढरपूर, परभणी, लातूर, कराड, सांगली असा विस्तारलेला यामध्ये वाचायला मिळतो.
हेडाम हे संघर्षाचे प्रतीक आहे. त्यात जय आहे. जिंकणे आहे. इरशा आहे. विरत्व आहे. बल आहे. शौर्य आहे. रूढी परंपरा आहे. सांस्कृतीक ठेवा आहे. भक्ती आहे. शक्ती आहे. आशा अनेक गुणांनी हेडाम ही कलाकृती परिपूर्ण वाड्मयीन कलाकृती असाही एक शोध घेता येईल.
लेखकाने आपल्या बोली भाषेत, धनगर समाजाच्या जीवनाची कथा सांगितलेली आहे. छोटी छोटी वाक्य, ग्रामीण बाज, ढब,लय मानदेशीपणा त्या शब्दांना आहे. त्यामुळे बोली भाषेतील माधुर्य आणि शब्दातील गोडवा त्यामध्ये असलेला दिसतो.
चिरगुट, कॅटेगिरी,स्पॉट ऍडमिशन, तंद्रीत,..ही शब्द कळा माणदेशी धनगर समाजाची बोली इतकीच सिमीत नसून प्रमाणभाषा आणि इंग्राजलेल्या समूहाची भाषा यामध्ये आल्यामुळे भाषिक अवकाश विस्तीर्ण झालेला अनुभवला येतो. या पुस्तकातील भाषिक आणि सांस्कृतिक बाजूचा स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो. त्या दृष्टीने संशोधक, विचार करतील अशी आशा आहे.
नागू च्या आई-वडिलांना शाळा मास्तर भेटणे आणि त्याच्या जीवनाला कलाटणी मिळणे हा या कादंबरीचा केंद्रबिंदू असला तरी या कादंबरीला अनेक कांगोरे आहेत. मानदेशाचा मुलगा मुंबईकर होणे असा एक प्रवास या दृष्टीने बघता येतो. धनगराच्या मुलाची शिक्षणासाठीची अडथळ्याची शर्यत किंवा पशुपालक जमातीचे उघडे वागडे जीवन, धनगर समाजाचे सामाजिक वास्तव, धनगरांचा सांस्कृतीक दस्तऐवज, भटक्यांची असुरक्षितता, सुंबरान, भाकणुक व ओवीतील सांस्कृतिक अनुबंध या आशयनिष्ठतेसह या पुस्तकातील कथनात्मकता, विरकरांची माणदेशी व्यक्तीचित्रे, माणदेशी भाषावैभव असाही विचार करता येईल.
पशुपालन,भटक्या, धनगर समाजाच्या जगण्याला सामाजिकतेची बाजू आहे तशी अभावग्रस्ततेची आहे. परीवर्तनाची बाळगुटी ही शाळेतील मास्तरकडून मिळते तशी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून, तेथील शिक्षकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून. ती लेखकाच्या जीवनातील भटकंती, त्यांचे स्थलांतर याला कलाटणी देणारी आहे. सामाजिक, सांस्कृतिक सजगता प्रगल्भता करणारे, माणदेशी भान जिवंत ठेवणारे हे वाचनीय ' हेडाम ' देशावरचा माणूस तर अनुभवतो आहे. पण मुंबईकर झालेल्या माणसाला नव्या पालवी देईल.त्याच्या एकूण जगण्या तरतरी आणेल हे मात्र निश्चित.