Summary of the Book
सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांचे सारेच वाङ्मय सर्वांगांनी रम्य असून, सतत वाचनात व चिंतनात ठेवावे असेच आहे. ‘अनादि निर्गुण प्रकटली भवानी’ हा लघुग्रंथ म्हणजे श्रीएकनाथ महाराजांच्या ह्या जोगव्याचे, प.पू.श्री.मामांच्या वाणीतून प्रकटलेले हे रसाळ निरूपण आहे. श्रीभगवंतांच्या चरणी शरणागत होणे कसे परमानंद प्राप्त करून देणारे ठरते, ते येथे श्रीसंत एकनाथ महाराजांनी सांगितलेले आहे.
अनादि निर्गुण भगवती कुंडलिनी शक्ती, ही श्रीगुरुकृपेच्या योगाने कोणत्या कार्यासाठी प्रकटली ? तर मोहरूपी महिषासुराचे मर्दन करण्यासाठी ! श्रीमद् भगवद्गीतेवर सद्गुरु श्रीमाउलींनी जी ‘भावार्थदीपिका’ नावाची टीका लिहिली आहे, तिच्यातून त्यांनी या मोहनिवृत्तीचेच उपाय प्रामुख्याने विवरण करून सांगितलेले आहेत.
श्रीमाउली बाराव्या अध्यायात म्हणतात, "प्राणशक्ती चामुंडा देवीपुढे, संकल्परूपी मेंढा मारून, तिला मनोरूपी महिषाचे मुंडके बळी दिले." म्हणजे मनाच्या मोहादी विकारांची, संकल्प-विकल्पांची निवृत्ती झाली. मनोरूपी महिषाचे मर्दन केल्यावर, मोहरूपी असुर शरण आला.
प.पू.श्री.मामा पुढे सांगतात की, जीव हा शुद्ध सोन्यासारखा, केवळ ब्रह्मरूप जरी असला तरी, त्याला त्या स्वरूपाची जाणीव होण्याकरिता, अनुभूती येण्याकरिता संकल्प, विकल्प, वासना, विकार इत्यादि किडाळ, साधना करून ज्ञानरूपी अग्नीत जाळावे लागते.
भगवती कुंडलिनी शक्ती कशा प्रकारे कार्य करते आणि जीवाला मोहबंधनातून सोडवून स्वरूपाची प्राप्ती कशी करवून देते, हा गूढ विषय प.पू.श्री.मामांनी ह्या ग्रंथातून अत्यंत सोप्या शब्दांत सांगितला आहे. सर्व साधकांना हा ग्रंथ नक्कीच आवडेल याची खात्री आहे.