Summary of the Book
`मृगजळाची तळी’ हे विजय पाडळकरांचे सहावे पुस्तक. वाचनाच्या साधनेतून जीवनाची आराधना करताना त्यांना सर्वांतिस, डोस्टोव्हस्की, फ्लॉबेर, बिमल मित्र व जी.ए. अशा महाभूतांनी झपाटले. सर्वांतिसच्या डॉन क्विक्झोटचे सगेसोयरे जागतिक वाङ्मयात कसे आणि कुठे भेटतात हे दाखवतानाच आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वातही एक डॉन कसा लपलेला आहे हे दाखवून त्यांनी साहित्य व जीवन यात एक नजाकतदार सेतू बांधला आहे.
समीक्षेची गुंतागुंत टाळून पाडळकरांची भाषा तर्काचा तोल राखते. त्यामुळे एकाच वेळी काव्यात्मता व वैचारिक गांभीर्य यांचा प्रत्यय देणारे हे ललितलेखन प्रत्यक्षात जरी ग्रंथविश्र्वाबद्दल असले तरी परम अर्थाने त्यापलीकडे पसरलेल्या विशाल जीवनाबद्दलच असते. मुळांत ग्रंथांच्या सावलीतून सुरू झालेली ही यात्रा जीवनाच्या असीम क्षितिजांचा ध्यास घेते. तिथे हेलावणार्या भास-आभासांच्या वेल्हाळ दर्शनांची चित्रे रेखाटते. तिथे भ्रम आणि भ्रमनिरासाच्या ज्या अनेक अर्थसंभवाच्या लाटा उमटतात त्यांचा अर्थ पाडळकर तरल संवेदनशीलतेने व एकाग्र चिंतनाने शोधताना दिसतात.
पाडळकरांची निखळ जीवननिष्ठा त्यांना या मुसाफिरीत मूल्यविवेकापासून ढळू देत नाही व त्यांची अढळ साहित्यनिष्ठा त्यांना समकालीन वादविवादापलीकडे वैश्र्विक साहित्याशी संवाद जोडून देते. सवंग लोकप्रियता व हरदासी बोधप्रियता यांच्या पार पलीकडे पसरलेले कलानंदाचे व जीवन जाणीवेचे मोकळे आकाश दाखविणारे हे पुस्तक मराठीतील एक विलक्षण वेगळे व दिलासा देणारे पुस्तक आहे.