Summary of the Book
प्रत्येकाची घराची कल्पना आणि स्वप्न निराळे असते. तुमच्या-आमच्यासारख्या ‘सामान्य’ पण ज्यांचं घर ‘असामान्य’ आहे असे सारेजण आपल्या घरासहित या वर्षीच्या ‘समदा’ या एकाच विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकातून आपल्या भेटीस आले आहेत. अंकाच्या सुरुवातीलाच समाजसेवेला सर्वस्व अर्पण केलेल्या अण्णा हजारे यांच्या घरात मृत्युंजय बोस डोकावतात, तर ‘आपल्या या घरात’ या विभागात माधवी देसाई, ज्योत्स्ना कदम, आनंद यादव, स्वाती कर्वे यांनी आपल्या घराच्या आठवणी शब्दबद्ध केल्यात.
आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून आजतागायत गेल्या सात-आठशे वर्षांतील काही कवींनी साकारलेली घरे शीला निपुणगे यांनी वाचकांपर्यंत पोहोचवली आहेत. गिरीश प्रभुणे, श्याम ढवळे, रमेश पडवळ आदी मान्यवरांचे लेखही अतिशय अभ्यासपूर्ण असेच आहेत.
गोव्याच्या वास्तूचा बोलका इतिहास कालिका बापट आणि मनस्विनी प्रभुणे यांनी उलगडलाय. ‘स्टॅटफर्ड अपॉन एव्हन’ या शेक्सपिअरची जन्मभूमी असलेल्या वास्तूच्या आठवणींना अरुंधती रानडे यांनी उजाळा दिलाय. याचबरोबर ज्ञानदा नाईक यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या घराचा प्रवास मांडलाय. केशवसुतांचे कोकणी पद्धतीचे घरही आपल्याला स्मरणरंजनात घेऊन जाते.
नाटकातील कल्पकतेने साकारलेल्या, घराला घरपण देणार्या घरांबद्दल नेपथ्यकार राजन भिसे आपल्याला सांगतात. ज्यांना आपल्या स्वप्नातले हवे तसे घर साकारायला मिळाले अशा अल्पना किलरेस्कर, प्रभा नातू, नीलिमकुमार खैरे यांनी आपले घराविषयीचे अनुभव आपल्याला सांगितलेत. तसेच स्वाती जरांडे, प्राची बारी, श्रद्धा पतके आदींचे लेखही वाचनीय आहेत. जयदीप कडू यांची मांडणी आणि मुकेश प्रभुणे यांचे मुखपृष्ठ आदींनी या अंकाची शोभा वाढवलीय.