Summary of the Book
खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुळचा धनगर, कोळी, रामोशी या जाती- जमातींचा हा देव सर्व मराठी समाजाने आपला मानला. त्याचप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील मैलार- मलाण्णा हा देव पशुपालक समाजाचा, पण तेथील बहुजनांनी त्याला स्वीकारले. मैलार हा दक्षिणेची देव आपल्याकडे मल्हार, खंडोबा या नावाने जनमानसात श्रद्धेने विसावला. दोन्ही प्रदेशांतील या लोकदैवतेविषयी जाणून घेऊन त्यासंबंधीचे संशोधन रा. चि. ढेरे यांनी 'दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा 'मधून मांडले आहे.
खंडोबाचा काळ पाहताना अकराव्या शतकापर्यंत मागे जावे लागते. मैलार उर्फ खंडोबा व माळव्व उर्फ म्हाळसा यांचा संबंध येथे शास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडला आहे.
'मल्लारीमाहात्म्य'मधून सांगितलेले खंडोबाचे महत्त्व, संत एकनाथ, बसवेश्वर, शेख महमंद, व्हिरा जातवेद, गोपाळ कवी, यदुमाणिक, समर्थ रामदास, केशवशास्त्र भागनगरकर, रंगनाथशास्त्री निगडीकर आदी संत - माहात्म्यांनी यांच्या रचनांमधील खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांचा उल्लेख करीत या सर्वांची संशोधनात्मक माहिती यात आहे.
खंडोबाची भक्ती, वाघ्या - मुरळी प्रथा, खंडोबा व ख्रिश्चन मिशनरी, लोकसाहित्यातील खंडोबा, खंडोबाची स्थाने, खंडोबाविषयक ग्रंथाचा परिचय देत ग्रामदेवता ते कुलदेवता हा खंडोबाचा प्रवास कसा होत गेला याचा शोध ढेरे यांनी घेतला आहे.