आपल्याला माहीत नसलेली, पण एकदा नक्की वाचून अनुभव घ्यावी अशी एक कहाणी.
फेब्रुवारी (2023) महिन्यात गणेश बर्गे यांचं कंट्या आणि शिरसवाडी पुस्तकांच्या खरेदी निमित्तानं न्यू इरा पब्लिशिंग हाऊस संस्थेमध्ये जाणं झालं. समोरच नव्यानं प्रकाशित झालेलं एकलव्य पुस्तक ठेवलं होतं. हातात घेऊन पाहण्याचा मोह काही आवरता आला नाही. अगदी शरद तांदळे यांच्या रावण सारखं मुखपृष्ठ, पाहताक्षणी मनाला भुरळ पाडणारं. भरदार नी पिळदार शरीरयष्टी, डाव्या हातात धनुष्य, उजव्या हाताचा नसलेला अंगठा, बोटांमध्ये धरलेले दोन तीन बाण आणि त्यातून ठिबकत असलेलं रक्त. छातीवर वाघाचं पांघरलेलं कातडं, महादेवा सारख्या बांधलेल्या जटा, पाठीवर बाणांचा भाता आणि कपाळावर दोरीने बांधलेलं कुण्या पक्षाची पिसं. विजय देवडे यांचं एकलव्य! पाहताक्षणी मनाचा ठाव घेणारं!
विजय सरांच्या एकलव्य बद्दल थोडफार ऐकलं होतं, आणि युट्यूब वर त्यांची मुलाखतही पहिली होती. नकळत उत्सुकता वाढू लागली होती. पुस्तकांच्या खरेदी निमित्तानं प्रकाशन संस्थेमध्ये जाणं झालं. पुस्तकांमुळे मित्र झालेले संतोष पाचे सध्या इथचं काम करत असल्यामुळे साहजिकच त्यांचीही भेट झाली. आणि अचानक विजय देवडे ( सरांच दर्शन झालं. याच्यापेक्षा मोठं नशीब ते काय असू शकतं! पुस्तकाबद्दल सरांशी चर्चा झाली. बोलणं झालं. आणि सरांची सही असलेलं पुस्तक घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह काही आवरता आला नाही. घाईत असल्याने सरांनी निरोप घेतला. संतोषकडून पुस्तके घेऊन तडक पहिलं घर गाठलं. फक्कडशी एक कॉफी बनवली आणि गॅलरीमध्ये शांतपणे वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेत एकलव्याचा प्रवास सुरू झाला.
महाभारतात एक भिल्ल म्हणून ओळखला जाणारा, द्रोणाचार्यांनी शिष्य म्हणून नकार दिल्या नंतर त्यांचा पुतळा बनवून स्वतःच धनुर्विद्या शिकणारा, कुत्र्याच्या तोंडात सात बाण मारून त्याला शांत करणारा, द्रोणांना गुरू मानून दक्षिणा स्वरूप स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा देणारा एकलव्य आपल्याला माहिती आहे. याच्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला त्याच्याबद्दल मिळत नाही. पण नक्कीच त्याच्याबद्दल आपल्या मनात एक हुरहूर, हळहळ जाणवत राहते. तो कोण होता, कुठून आला होता, त्याचं पुढे काय झालं असेल? इतर अनेक प्रश्न! आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकलव्य ही कादंबरी नक्कीच देते. ओघवती, सोपी आणि सहज भाषाशैली मध्ये पुढे पुढे जाणारी कथा आपल्याला एकलव्य तसेच त्याचं कुटुंब, त्याचे मित्र यांची ओळख करून देते. त्यांचं राहणीमान, वेशभूषा, समाज वगैरे गोष्टी समजू लागतात. ठसठशीत आणि मनाचा ठाव घेणारे नेमके संवाद ही कादंबरीची जमेची बाजू. कादंबरीतील प्रत्येक प्रकरणामध्ये एकलव्य हळूहळू उलगडत जातो, आणि त्याचबरोबर आपणही त्याचा सहप्रवासी असल्यासारखे त्याच्या आजूबाजूला फिरत राहतो. त्याला अनुभवत राहतो. कादंबरीमध्ये इतिहासाला धरून कुठेही अतिशयोक्ती किंवा चमत्कारिक न मांडता स्वतःच्या, कष्टाने आणि जिद्दीने धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठत्व मिळवणारा एकलव्य रेखाटला आहे. यातूनच लेखकाच्या अभ्यासाचा आणि परिश्रमाचा थोडाफार अंदाज आपण बांधू शकतो.
एकलव्य आहे म्हणजे द्रोण आले आणि द्रोण आले म्हणजे पांडव, कौरव आणि अनायासे महाभारत आलंच. कादंबरीतून अर्जुन, कर्ण, अश्वत्थामा आणि इतर मंडळी डोकावतात. आणि अर्थातच श्री कृष्णही. कारण त्याच्या शिवाय, एकलव्याचं आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, की याचा काय संबंध? हेच जाणून घ्यायचंय तर मग एकलव्य समजून घेतलाच पाहिजे. एकलव्याला गुरूद्रोणकडून शिक्षणास नकार मिळूनही पठ्ठ्या हार मानत नाही. जंगलात राहून त्यांनाच गुरुस्थानी मानून धनुर्विद्या शिकत राहतो. बाण सोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकत राहतो. अविरत सराव करत राहतो. आणि त्यात तो परिपूर्णता मिळवतो. निसर्ग हाच सर्वात मोठा गुरू असतो. तोच आपल्याला शिकवत असतो. आणि त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहून तो अलौकिक अशी धनुर्विद्या संपादन करतो. कदाचित, तो द्रोणांकडे राहूनही ते शिकू शकता नसता.
एखादा जर आपल्या पुढे जात असेल, प्रगती करत असेल तर मनुष्य स्वभावानुसार त्याला खाली ओढण्याचा किंवा त्याच्याकामा मध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची कमकुवत बाजू हेरून घाव घातला जातो. त्सन झू यांच्या आर्ट ऑफ वार मध्ये सांगितलेलं आहे, जर आपला शत्रू आपल्यापेक्षा ताकतवान असेल आणि आपण त्याला त्या गोष्टीत जर हरवू शकत नसेल तर त्याच्या कमकुवत बाजूवर हल्ला करा. जेणेकरून मानसिक खच्चीकरण होऊन तो आपोआपच मागे ओढला जाईल किंवा माघार घेईल. इथेही नेमकं आपल्याला हेच अनुभवायला मिळतं. पण काहीतरी चुकीचं होतंय, अन्याय होतोय हे जाणवत राहतं.
चला, आता जास्त वेळ न घेता आवरतं घेतो. सगळं सांगत राहिलो तर एकलव्य अनुभवण्याची मजा कशी येईल. हा छोटेखानी लेख संपवताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की शरद तांदळे सरांच्या रावणला टक्कर देईल असा एकलव्य विजय देवडे सरांनी नक्कीच साकारला आहे. देवडे सर आणि सर्वांचे खूप आभार आणि धन्यवाद. सरांकडून असेच उत्तमोत्त लेखन कार्य घडत राहो, या सदिच्छा !
एकलव्या बद्दल अनेक नवीन माहिती ह्या पुस्तकातून मिळाली तो एक वनवासी होता की राजपुत्र होता, राजा होता नेमका कोण? त्याचे आई वडील कोण? महाभारतात नेमके एकलव्याचे स्थान काय ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ह्या कादंबरीतून मिळतात