Summary of the Book
सध्याचं जग हे ताणतणावाचं आहे, ताणतणाव किंवा टेन्शन याचे बळी पडलेल्यांची उदाहरणं आपण ऐकतो किंवा पाहतो. त्याचवेळी आपण स्वत:ला सुरक्षित मानतो. तेव्हा आपणही एखाद्या ताणाला बळी पडलेले असू शकतो. नकळत एखाद्या गोष्टीत मनावर ताण येतो आणि त्याचं पर्यवसान शरीराच्या सुरक्षाव्यवस्थेवर होतो. यासाठी ताण कोणत्याही प्रकाराचा असो, त्यापासून दूर राहण्यासाठी 'हसत जगणं’ आवश्यक असतं.
डॉ. रमा मराठे यांचं 'हसत जगावं’ हे पुस्तक याच विषयाशी संबंधित आहे. अचानक हार्टऍटॅकची शिकार झालेल्या व्यक्तीबद्दल आपण हळहळतो; पण अचानक शरीरात काही घडत नसतं. वर्षानुवर्ष माणसानं त्याची तयारी नकळत केलेली असते. शरीरात लढाई चालूच असते. त्याचे परिणाम फक्त अचानक दिसतात.
या पुस्तकात एकूण अठरा लेख आहेत. त्यामध्ये टेन्शन येतं म्हणजे नक्की काय होतं? त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, म्हणजे टेन्शन्स नको तितकी झाली की, त्याचे शरीरावर प्रतिकूल परिणाम होतात, योग्य तेवढंच टेन्शन माणसाला कार्यप्रवण करतं. तेव्हा ते किती घ्यावं, याबद्दलची माहिती उदाहरणांमधून सांगितली आहे. सतत तणावाखाली राहिलं, तर त्या व्यक्तीचा एखादा अशक्त अवयव त्याला बळी पडतो. म्हणून नेहमी हसत जगावं. हसण्याने, स्वीकार करण्याने तणावाचे परिणाम कमी होतात.
ताणांचे बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक असे प्रकार असतात. सर्व प्रकारच्या ताणांवर मात करता येते. ती कोणत्या पद्धतीने ? तणावाला पोषक असं आपलं व्यक्तिमत्त्व आहे का? असल्यास त्यावर उपाय काय? शारीरिक किंवा मानसिक वेदना कशा कमी करायच्या? ताणतणावांचा जमाखर्च मांडून स्वत:चा फायदा कसा करून घ्यायचा? तणावमुक्तीसाठी वापरायचं तंत्र कोणतं आहे? वेदना सहन करण्यासाठी काय करावं?
दु:ख प्रत्येकाला असतंच. पण त्या दु:खापेक्षा मोठं झालं तरच जगणं सुसह्य होतं. ताण कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे श्रद्धा. ती कशी उपयोगी पडते? मात्र श्रद्धेचं अंधश्रद्धेत रूपांतर होता कामा नये. मीपण किंवा अहंकार ताणतणावाला कसा पोषक ठरतो? पती-पत्नींचा एकमेकांशी सुसंवाद का हवा? कसा हवा? अपेक्षा वाढल्या की ताणतणाव कसे वाढतात? अशा विविध अंगाने ताणतणाव आणि शरीराची सिस्टीम याचा अभ्यास या पुस्तकात केलेला दिसतो. तसेच त्यावरचे उपायही सांगितलेले आहेत.