Bookbandhu_Reviews (Omkar Bagal)
01 Apr 2025 05 30 AM
गोष्टीरूप हरिपाठ - अनिल फडणवीस
पुस्तक परीक्षण/ Book Review - ओंकार बागल
प्रकाशन - नीमट्री पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठ संख्या - २०२ पाने
हरिपाठ, याचा शब्दशः अर्थ म्हणजे हरीचा पाठ. हरीचे (विठ्ठलाचे) नामस्मरण करणे. हरिपाठ म्हणजे निरंतर ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंगरचना. काही हरिपाठात ३० अभंग आहेत, तर काही हरिपाठात २७ अभंग आहेत. वारकरी संप्रदायात हरिपाठाचे महत्त्व अधिक आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांचे अभंग हरिपाठात समाविष्ट आहेत. मात्र यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ अतिशय लोकप्रिय आहे. एकूणचं हरिपाठ म्हणजे हरीला (विठ्ठलाला) प्राप्त करून देणारे तत्त्वज्ञान असंही म्हणता येईल.
'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकाचे विवेचन करण्याआधी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे धार्मिक आणि अध्यात्मिक या दोन संकल्पनांतील फरक अथवा पुसटशी तफावत. विधी, व्रतवैकल्प, उपवास, पूजा, अर्चना ई. गोष्टी झाल्या धार्मिक. तर अध्यात्म म्हणजे जीवनाचा सखोल अर्थ आणि उद्देश शोधण्यासाठी चालू असलेला व्यक्तीचा प्रवास. अध्यात्मात पूजा, विधी, सिद्धांतांचे पालन करण्याची तितकीशी आवश्यकता नसते. या दोन संकल्पना एकमेकांशी बहुतांशी सुसंगत असल्या तरी त्या अगदी वेगळ्या आहेत. असे असले तरी, अध्यात्म आणि धर्म दोन्हीही स्वतःच्या आणि परमात्म्याच्या जवळ जाण्याचे मार्ग आहेत हेही तितकेच खरे. त्यात हरिपाठ म्हणजे बऱ्याचदा संतवाणीतील एक अतिशय सुंदर आणि सुरेख प्रयोग. 'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकाद्वारे हरिपाठातील अभंग अतिशय सुलभपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
हरिपाठ म्हणजे अध्यात्मिकदृष्टीने परमात्म्याच्या आणि त्यायोगे स्वतःच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे; परंतू आजकाल लोकांना अध्यात्म म्हणजे देव देव करणे आणि कंटाळवाणे वाटते. याची प्रामुख्याने दोन कारणे असू शकतात, एक म्हणजे त्यांना अध्यात्म समजावू शकेल असं कोणतंही साधन मिळालं नसेल किंवा दुसरं म्हणजे त्यांना त्यांच्या भाषेत, म्हणजेच त्यांच्या रोजच्या जगण्यातील, वापरातील, बोलण्यातील शब्दांत अध्यात्म समजवणारं साधन मिळालं नसेल. हे साधन कोणतंही असू शकतं, मौखिक वा लिखित. मात्र त्यांच्यापर्यंत ते पोहचणं गरजेचं आहे. याच जाणिवेतून लेखक अनिल फडणवीस यांनी 'गोष्टीरूप हरिपाठ' हे पुस्तक लिहिले आहे. लेखकांचे वाचन दांडगे असून, आजच्या पिढीशी आणि डिजिटल युगाशी ते बऱ्याच अंशी एकरूप झालेले असल्याने पुस्तकातून वाचकाला नेमके काय द्यावे हे त्यांना निश्चित उमगलं आहे असं जाणवतं.
या पुस्तकाची एक अतिशय सुंदर गोष्ट म्हणजे तिचं गोष्टीरूप असणं. एखादी गोष्ट समोरच्याला चांगल्याप्रकारे समजाविण्यासाठी ज्याप्रकारे आपण काही दाखले देतो, उदाहरणे देतो, गरज पडली तर एखादी समरूप गोष्ट सांगतो. अगदी त्याचप्रकारे लेखकांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. तरुण वयातील वाचकापासून ते वयोवृद्ध वाचकापर्यंत या पुस्तकाची भाषाशैली अगदी सोपी, सरळ, समजण्यासारखी आहे. ही गोष्ट खरंचं खूप चांगली झाली की हरिपाठातील सारे अभंग गोष्टींच्या रूपाने समोर आले. कारण अभंगांची रचना ही म्हणावी तर सोपी आणि म्हणावी तर अवघड. एका शब्दाचा अर्थ जरी वेगळा घेतला तरी अभंगाचा मतितार्थ आणि त्यातील उत्कट भाव काहीतरी निराळाच बनून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे लेखकांनी अगदी मुद्द्याला धरून असणाऱ्या आणि अभंगाला लागू होतील अशा मोजक्या गोष्टी दाखल्यांसाठी वापरल्या आहेत.
'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकातून आपल्याला अनेक विविधांगी गोष्टी समजतात. जसं की नामस्मरण का गरजेचं आहे? नामस्मरण कसे करावे? योग अभ्यास काय असतो? प्रपंचात राहूनही हरिभक्ती कशी करता येईल? माणसासाठी ईश्वराची भक्ती किंवा हरिजप कशाप्रकारे उपयुक्त आहे? समाधी अवस्था म्हणजे नक्की काय? सत्संगंती आणि संतसंगतीचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो? ईश्वराच्या सानिध्यात असणं म्हणजे काय, आपल्याला त्याचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो? षडरिपू कोणते आणि ते कसे ओळखावे? खरा साधूसंत कसा ओळखावा? यासोबतचं गुरु-शिष्य परंपरा, ध्यान आणि ध्यानाचे प्रकार, श्रोत्यांचे प्रकार, साधनेच्या गतीचे प्रकार, तीर्थयात्रेचे महत्त्व, पाप आणि त्यामुळे होणारे नुकसान, बुद्धीचे वैभव, ज्ञानेंद्रियांची अनुभूती अशा अनेक गोष्टींबद्दल वाचकाला जाणून घेता येईल.
मुळात 'अध्यात्म' हा विषयचं असा आहे की ते समजून घेण्यासाठी आपल्या कोणाची तरी मदत घ्यावी लागते. त्यासाठी हरिपाठातील अभंगांचे अचूक भावार्थ समजून घेण्यासाठी या पुस्तकासारखे उपयुक्त साधन दुसरे नाही. बरं त्यात अध्यात्माचा आवाका थोडादेखील नव्हे. अभंग हा केवळ मोजक्या ओळींचाचं; परंतू त्यातून ज्ञानाची कवाडे खुलतात अनेक! त्यामुळे त्यातील आपल्याला हवा तितकाच भाव आणि वाचणाऱ्याला जिथपर्यंत तो समजेल तिथपर्यंतचा अर्थ तशा पद्धतीने वेचणं आणि त्यानुसार लिहिणं गरजेचं, हे समजून उमजून या पुस्तकाची बांधणी केली गेली आहे. लेखकांचा प्रवचनांचा अनुभव त्यांच्या लिखाणातून चटकन लक्षात येण्यासारखा आहे. शिवाय पुस्तकात त्याचा बऱ्याच ठिकाणी फायदा झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. इतकचं काय तर लेखकांनी या पुस्तकात अभंग समजावून सांगताना काही ठिकाणी कबिरचे दोहे, गालिबच्या ओळी आणि ख्रिस्ती संतांचे दाखलेदेखील आहेत.
आजच्या पिढीला त्यांच्या भाषेत समजावून सांगणं म्हणजे खरं तर जिकिरीचा उद्योग. त्यात देव देव डोक्यात टाकणं म्हणजे कपाळावर आठ्या येण्यासारखंचं. कारण आजची पिढी अध्यात्माला खूपचं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते, समजते आणि आत्मसात करते. त्यामुळे त्यांना अथवा अशा वाचकांना थोड्या वेगळ्या पद्धतीने हाताळणे महत्वाचे. याचा सारासार विचार करून, गरजेनुसार, त्या त्या अभंगांचा अर्थ सांगताना लेखकांनी कविता, बहिणाबाईंची गाणी, पसायदानाच्या ओळी, व्हॉट्सॲप मेसेज, फेसबुक पोस्ट्स, इंग्रजी कोट (Quote), हिंदी सिनेमातील ओळी, हिंदी शायरी, सोशल मीडिया पोस्ट्स ई. गोष्टी बिनचूक वापरल्या आहेत.
-©ओंकार दिलीप बागल