Summary of the Book
मधु'घट' वाहतो भरभरुनी
गेली पन्नास वर्षं सातत्याने कसदार लेखन करणार्या मधु मंगेश कर्णिक यांच्या कारकिर्दीचा वेध या पुस्तकात घेतला आहे. विजया राजाध्यक्ष यांनी कर्णिक यांच्या साहित्याची अतिशय अभ्यसनीय साहित्यमीमांसा केली आहे. ही मीमांसा करताना त्यांनी कर्णिकांच्या कथा, कादंबरी, ललितलेखन अशा सर्व साहित्याविषयीची निरीक्षणं अतिशय बारकाईने नोंदवली आहेत.
राजाध्यक्ष यांच्याप्रमाणेच डॉ. चंदकांत बांदिवडेकर, प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. स्मिता पाटील, नीरजा, वृषाली मगदूम, डॉ. सिसिलिया कार्व्हालो. डॉ. सुभाष भेंडे, डॉ. आनंद पाटील या मान्यवरांनी कर्णिकांच्या साहित्याचा वेगवेगळ्या अंगाने आढावा घेतला आहे.
हा आढावा कर्णिकांच एकूणच मराठी साहित्यातील योगदान अधोरेखित करणारा आहे. मात्र, त्यातही नीरजा यांचा 'स्त्री आणि दलित जीवनाचे चित्रण', प्रदीप कर्णिक यांचा 'कर्णिकांच्या साहित्यातील महानगरीय संवेदना', डॉ. अनंत देशमुख यांचा 'कर्णिकांच्या साहित्यातील समग्रता' आणि डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचा 'चिंतनशील ललित जिव्हाळा' हे लेख कर्णिकांच्या साहित्याचं वेगळेपण सांगणारे आहेत. याशिवाय कर्णिक यांनी वेगवेगळ्या नियतकालिकांत लिहिलेले लेखही यात आहेत.
हे लेख आणि पुस्तकाच्या शेवटी केळुसकर यांनी घेतलेली कर्णिकांची मुलाखत, यामुळे पुस्तकाच्या महत्तेत भरच पडली आहे.