‘उभयान्वयी अव्यय’ या कादंबरीत अश्लीलता, किंवा बोल्डपणा वगैरे आहे हे खरंय, पण ते त्याचं डिफायनींग अॅस्पेक्ट नक्कीच नाही. मला यात सर्वात महत्वाची वाटते ती मुंबई. केवळ जुन्या मुंबईची आठवण म्हणूनही नाही. इथे मुंबई महत्त्वाची आहे ती या भयंकर चमत्कारिक आयुष्य जगणाऱ्या, कनिष्ट मध्यम वर्गात जन्मलेल्या नव्याने तरुण होणाऱ्या मुला-मुलींची ‘आई’ म्हणून’! ही मुलं त्यांच्या रक्ताच्या नात्यांशी कधीच जवळ राहिली नाहीत. या मुलांना/तरुणांना नेमकं घर असं नाही, म्हणजे ही वाढली एखाद्या टिपिकल चाळीत, पण एकदा ही वाढली कि त्यांचं स्वतंत्र अस्तित्व सुरु होतं. आणि अश्यावेळी ही सारी मुंबा नगरी त्यांची आई असल्याप्रमाणे वाटते! या कादंबरीचा नरेटर, प्रदीप सावंत असाच चाळीत वाढलेला आणि मग त्याचा मुंबईच्या सगळ्या प्रकारच्या जगण्याशी संबंध येत जातो. त्याचा गरीब घरातला मुलगा ते कारकून ते लेखक ते मेल प्रॉस्टीट्युट हा प्रवास जर कथानकाच्या अंगाने पाहिला तर तसा विलक्ष्ण नाही मात्र त्याचं विश्व हे कथनकापेक्षा इथे अधिक महत्त्वाचं आहे. त्याचा जिगरी दोस्त ‘दिनकर’ हा या कादंबरीचा खरा ‘सोल’ आहे असं म्हटलं पाहिजे.