Summary of the Book
फॅमिली डॉक्टर'मधून "गर्भसंस्कार' ही लेखमालिका सुरू केल्यानंतर अनेक स्त्रियांची पत्रे आली, या विषयाचे गांभीर्य समजावून घेतल्यामुळे त्यांना लाभ झाला तसेच प्रसूती लवकर व नॉर्मल होण्यासाठी असलेला "बाळंत लेप - इझी डिलिव्हरी लेप' वापरल्याने फायदा झाल्याचे अनेकांनी कळवले. ...... ही लेखमाला आमच्या पाहण्यात उशिरा आली, अगदी नववा महिना सुरू असताना आम्हाला ही लेखमाला चालू असल्याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आता काय करावे? अशी विचारणा करणारीही पत्रे आली. या विषयावर चर्चासत्रे वा एक-दोन दिवसांची शिबिरे घेऊन याची अधिक माहिती करून घ्यायची इच्छा दाखविणारी अनेक पत्रे आली. त्यात सुचविलेली योगासने, व्यायाम, मसाज वगैरे शिकण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केली. अशा तर्हेने गर्भसंस्कार विषयाच्या बाबतीत लोक जागरूक झाल्याचे निदर्शनास आले. म्हणून याचे एक पुस्तक तयार केल्यास ते कायम घरात राहू शकेल व पिढ्यांपिढ्या या पुस्तकाचा उपयोग होईल, या दृष्टीने या पुस्तकाचे काम तातडीने करण्याचे नक्की झाले.
आयुर्वेदिक पद्धतीने किंवा भारतीय परंपरेने जे काही सांगितले तशी परिचर्या लोकांपर्यंत पोचवावी व त्याबरोबरीने आधुनिक संशोधनाची मदत घेण्याची वेळ आल्यास किती प्रमाणात व कशी करून घ्यावी यासंबंधीची माहितीही यात असावी असे ठरले. समोर उभ्या टाकलेल्या जीवनाचा विचार महत्त्वाचा ठरतो. म्हणून, जीवन आनंदमय व संतुलित होण्यासाठी कृती म्हणजे "संस्कारां'चे विज्ञान सर्व शास्त्रांनी एकमताने तयार केले.
आयुर्वेद हा जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा विषय असल्यामुळे त्यात असणार्या आठपैकी एका विभागात अपत्यप्राप्ती व स्त्रीआरोग्य यावर लिहिलेले आहे. त्याच्याच जोडीला रसायन व वाजीकरण हे विभागही तयार केले, रसायन व वाजीकरण जर बरोबर नसेल तर स्त्रीआरोग्य, पुरुष आरोग्य व पर्यायाने अपत्य संस्कारित होणार नाही. आयुर्वेदात या अंगाने अनेक गोष्टी सांगितल्या.
मुलांमध्ये काही दोष उत्पन्न झाले, तर आई वडिलांचे आयुष्य व मेहनत अशा मुलाला मोठे करण्यातच खर्ची पडते. त्याउलट जर आरोग्यवान, बुद्धिमान, संस्कारित मुले जन्माला आली तर सर्व काम सोपे होऊन समाजाला उपयोगी घटक तयार होतात. हे संस्कारशास्त्र तयार करताना आयुर्वेदाने जीवनाच्या सर्व अंगाना उपयोगी पडणार्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक घटकांचा ऊहापोह केला गेला. त्यामुळे गर्भ राहण्यापूर्वीची प्रकृती व तयारीवर विशेष भर दिला. एखादी लहानशी गोष्ट करतानाही काही तयारी करणे आवश्यक असते. लग्न करून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू लागणे ही काही गर्भधारणेची तयारी असू शकत नाही. कुठलीही तयारी न करता आलेल्या अनाहूत पाहुण्याला तोंड देताना तारांबळ उडण्याची परिस्थिती न येण्यासाठी "आपल्याला मूल हवे' हे योजनापूर्वक ठरवून नंतरच नवागताला बोलवावे हा साधा व सरळ शिष्टाचार वाटत नाही का? त्यानंतर दिवस राहिल्यावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव गर्भाच्या किंवा मातेच्या आरोग्यावर जन्मभर दिसणार त्या गोष्टींकडे लक्ष देऊन तसे संस्कार करून द्यायला नकोत का?
वास्तविक पाहता, पोटात नऊ महिने गर्भ सांभाळणे हा एक आनंदाचा व उत्सवाचा काळ आहे. गर्भारपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात काही पथ्ये पाळावी लागतात. काय खावे, काय खाऊ नये, डोहाळे कसे पुरवावे, कुठला योग करावा, कोठली आसने करावीत, स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे, तिने काय पाहावे, आपल्या शयनगृहात तिने कुठली चित्रे लावावीत, रोज कुणाला भेटावे, कुठल्या तरी भलत्याच प्रसंगाला सामोरे जाऊ नये अशी दिनचर्या संस्काराचाच एक भाग असते.
पोटात मूल वाढत असताना कोणती औषधे घ्यावीत, जी उष्णता वाढविणार नाहीत, याची काळजी गर्भारपणात घ्यायला नको का? जन्मजात मुलाच्या अंगावरील त्वचेवर पुरळ (रॅश) असणार नाही, त्याच्या हृदय वगैरे अवयवात काही दोष असणार नाही याची काळजी गर्भारपणातच घेणे आवश्यक असते. गर्भारपणाच्या आधी पंचकर्म करून रसायन वाजीकरण चिकित्सा करून दांपत्याने तयारी केली असल्यासच पुढे चांगले परिणाम दिसतात. "फेमिनाईन बॅलन्स' सारखे संगीत ऐकल्याने सर्व शरीराचे संतुलन होऊन गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक व मानसिक पातळ्यांवर सुपीक जमीन तयार होऊन गर्भ राहिल्यावर संगीताचा, मंत्रांचा, ओवाळण्याचा वगैरे संस्कार केले तर सुंदर निरोगी व सुदृढ अपत्यप्राप्ती होते असा अनेकांचा अनुभव आहे.
सध्या घरात फारशी कोणी वडीलधारी मंडळी नसतात. गर्भ राहिल्यावर काय करावे, मुलाला कसे वाढवावे, मसाज कसा करावा वगैरे गोष्टी नवदांपत्याला माहीत नसतात. पण याचे शिक्षण घेणे आवश्यक नाही का? नोकरी-धंदा करण्यासाठी व पैसा कमविण्यासाठी आपण सर्व तर्हेचे शिक्षण घेतो पण जीवनोपयोगी व कुटुंबास आवश्यक असणारे वंशवृद्धीचे हे शिक्षण घेणेही आवश्यक नाही का? आपल्या घरात वडीलधारी मंडळी वा फॅमिली डॉक्टर असतात तशाच पद्धतीने या सर्व संस्कारांची माहिती आधुनिक पिढीला मिळाली तर खूप उपयोग होऊ शकेल, फॅमिली डॉक्टर हा जसा कुटुंबाचा सल्लागार असतो तसे जीवनाच्या या महत्त्वाच्या अंगांची विस्तृतपणे माहिती व कौटुंबिक मार्गदर्शन देणारे आहे हे "गर्भसंस्कार पुस्तक'.
आयुर्वेदाने सांगितलेल्या गर्भसंस्कारांबरोबरच संगीतशास्त्र, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा इतर शास्त्रांनी या विषयात सांगितलेले आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात विचारात घेतले आहेत. प्रत्येकाने सहकार्य करायचे ठरवून बालक जन्मण्यापूर्वीच जर गर्भसंस्कार करून काळजी घेतली तर जीवनाचे नंदनवन होऊन पुन्हा सर्वांना आनंद, सौंदर्य व शांतीचा लाभ होईल.