Summary of the Book
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तांत्रिक विषय आहे, पण अच्युत गोडबोले यांनी तो अगदी सोप्या भाषेत मांडला आहे. त्यामुळे ज्यांना या विषयात रस आहे, त्यांना तो समजायला सोपा जाईल. AI ची प्रगती, त्याचा आवाका, त्याचे उपयोग, आव्हानं, संधी... या सगळ्यांवर भाष्य करून लोकांना AI ची ओळख करून देणारं हे पुस्तक आहे.
- डॉ. अनिल सहस्रबुद्धे
चेअरमन, AICTE
कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात मानवाच्या उपजीविकेवर नकारात्मक किंवा सकारात्मक होऊ पाहणारा परिणाम व मानवाच्या जगण्याविषयीच्या संकल्पनांतच होऊ पाहणारी उत्क्रांती, या अशा गंभीर व अतिमहत्त्वाच्या बाबतीत सर्वंकष व सर्वसमावेशक चर्चा होणं अत्यावश्यक आहे. म्हणूनच अच्युत गोडबोले यांचं हे सखोल विवेचन असलेलं पुस्तक या संदर्भात वाचकांना पर्वणीच ठरावी.
- डॉ. अनिल काकोडकर
पद्मविभूषण, प्रसिद्ध संशोधक, AICTE चे प्रतिष्ठित चेअर प्रोफेसर,
‘राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे चेअरमन,
ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे पूर्व चेअरमन
अच्युत गोडबोले आपल्या काळातले वेगवेगळ्या विषयांमधले विपुल लेखन करणारे लेखक आहेत. त्यांनी AI च्या इतिहासावरून हळुवारपणे जात असताना सद्यःपरिस्थितीचा ऊहापोह करत या पुस्तकात AI च्या भविष्याची अतिशय कल्पक मांडणी केली आहे. हे पुस्तक जितकं माहितीपूर्ण आहे तितकंच ते अंतर्दृष्टी देणारं आहे. AI चा आपल्यापैकी फक्त काही लोकांवरच नाही, तर सगळ्यांवरच परिणाम होणार आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजातल्या फक्त काही ठरावीक घटकांनीच नाही, तर सगळ्यांनीच वाचायला हवं.
- डॉ. रघुनाथ माशेलकर
पद्मविभूषण, FRS, नॅशनल रिसर्च प्रोफेसर, CSIR चे माजी डीजी, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमीचे माजी प्रेसिडेंट, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे माजी चेअरमन
अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. AI च्या तंत्रज्ञानाची ओळख, त्याचा इतिहास, त्याचे उपयोग आणि भविष्य, या सगळ्यांची एखाद्या गोष्टीरूपात मांडणी केल्यामुळे हे पुस्तक खूपच वाचनीय व अभ्यासनीय झालेलं आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक यांनी आणि खरं तर सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायलाच हवं.
- डॉ. विजय भटकर
पद्मभूषण, प्रसिद्ध संशोधक, परम सुपरकॉम्प्युटरचे जनक,
C-DAC चे संस्थापक