Summary of the Book
'कवितेचं दीर्घरूप म्हणजे ललितलेख' अशी धारणा बाळगून अशोक कोतवाल यांनी 'सावलीचं घड्याळ' वाचकांच्या डोळ्यांपुढं ठेवलं आहे. लोकांच्या पसंतीला उतरू पाहणारी प्रतिभा या लेखकाकडे आहे. कविनावाचा लौकिक त्यानं परिश्रमपूर्वक कमावलेला असल्यामुळे कोतवालांच्या कवितेचंच दीर्घरूप सावलीच्या घड्याळामधून बोलकं होत गेलं आहे. 'पद्मगंधा प्रकाशन'नं या पुस्तकाचं लावण्य नेमकं खुलवलं आहे. चंदमोहन कुलकणीर्ंचं कव्हर आणि राजू बाविस्करांची ललितगणिक असलेली रेखाचित्रं या दोन कलात्मक गोष्टीमुळं कोतवालांच्या ललितबंधाला उत्तुंग उंची मिळायला अर्थातच मोठी जागा प्राप्त होत गेलेली आहे. 'स्पर्शाची भाषा', आणि 'थंडीचे दिवस' यांच्यासह या पुस्तकांत २५ ललितलेख वाचावयास मिळतात. फुलांचा सुगंध दरवळावा, त्याप्रमाणे कविमनाची भेट सावलीच्या घड्याळातून होत राहाते. स्वत: कोतवालांनीच नमूद केल्याप्रमाणं या सर्व ललितांमधून अनुभवांचे सच्चेपण व लालित्य अनुभवायला मिळते. पण लेखक म्हणतो त्याप्रमाणं ही ललिते आनंद देतात. परंतु अस्वस्थ मात्र करीत नाहीत!