Summary of the Book
अठराव्या शतकाच्या कालखंडात मराठी सत्तेला उतरती कळा लागली होती. पेशवाई संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. या शतकात राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती अस्थिर होती.
सत्ताबदल घडत असताना परकीय शक्तींचा अंमल घट्ट होत होता. या वातावरणात समाजाला भक्तीच्या मार्गावरून नेऊन योग्य दिशा दाखविण्याचे काम संत हरिस्वामी यांनी केले. वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदायात समन्वय त्यांनी साधला.
त्यासाठी 'ज्ञानसागर ' ग्रंथाची रचना केली. हरिस्वामी यांच्या चरित्राचा वेध घेत शोभना भालेराव यांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. अठराव्या शतकातील स्थिती, हरिस्वामी यांचे कौटुंबिक जीवन, समर्थ संप्रदायाची दीक्षा, त्यांचे मठ, आख्यायिका, शिष्य परिवार, समाज प्रबोधन करताना तत्कालीन लोकजीवनाचा त्यांनी केलेला सूक्ष्म अभ्यास, त्यांचे तत्वचिंतन,
भक्तियोग, गुरुभक्ती, योगाभ्यास, नीतीविचार, विविध विषय व विशेष विचार; तसेच शेवटी त्यांच्या ज्ञानसागरातील सार काय आहे, हे सांगितले आहे. या सर्व प्रकरणांमधून हरिस्वामी यांचे विस्तृत कार्य वाचकांसमोर येते. त्यातून जगाच्या दृष्टीने फारसे ज्ञात नसलेल्या या संताची परंपरा समजते.