अवघ्या माहाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या विठ्ठलाची महती संतांनी अभंग, पदे, भारुडे, गौळणी लिहून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे. भक्तीचे तत्त्व उलगडतानाच काही संशोधक साहित्यिकांनी विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतला. त्यांना दिसलेले त्याचे रूप, विविध प्रकारे आलेली अनुभूती, विठ्ठलतत्त्वाचा शोध, वेध व मागोवा यांचा आढावा ‘अवघाचि विठ्ठल’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे. देविदास पोटे हे या पुस्तकाचे संपादक आहेत. यात रा. चिं. ढेरे यांनी शोधलेले विठ्ठलाचे मूळ, डॉ. हे. वि. इनामदार यांचा संत नामदेवांचा विठ्ठल, इतिहासाचार्य राजवाडे आणि वि. ल. भावे यांच्या नजरेतील विठ्ठल व अन्य संतांचे विठ्ठलनाम यांबद्दल डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिले आहे. डॉ. भा. पं. बहिरट, डॉ. कुमुद गोसावी, बाळ राणे, डॉ. लीला गोविलकर, डॉ. यशवंत साधू, साधना कळवणकर, वा. ना. उत्पात, डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली अशा विविध नामवंत लेखकांचे सुमारे ५० लेख यात असून, प्रत्येकाच्या दृष्टीतून दिसणारे विठ्ठलाचे रूप व महती यातून व्यक्त होते.
‘अवघाचि विठ्ठल’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5249701351997266713