जबरदस्त, थरारक आणि उत्कंठावर्धक...!
योगायोगाने काल न्यू इरा प्रकाशन हाऊस ऑफिस मध्ये कोयाडेसरांशी भेट झाली. त्यात दिवसही १७ जून २०२३ आणि आमच्या आनंदाला आणखी चार चाँद लागले. केदारनाथ वाचून आमचे मित्र संतोष पाचे यांच्याशी सविस्तर फोनवर बोलणं झालं होतं. पण प्रत्यक्ष भेटून बोलूया म्हणून प्रकाशन संस्थेमध्ये गेलो आणि नशीब नशीब म्हणतात ते हेच का? याचा अनुभव आला. कोयाडेसर भेटले आणि मग त्यांच्याशीच पुस्तकाचा अनुभव शेयर केला. त्यांची सही आणि फोटो घेण्याचा मोह काही आवरता आला नाही.
कोणत्या शब्दांत कौतुक करावं कळत नाही. एवढं प्रगल्भ आणि ताकतीचं लेखन वाचलं कि, स्वतःच्याच लिखाणाची पातळी अजूनही डबक्यातल्या बेडकासारखी वाटते. डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची दुसरी कादंबरी "केदारनाथ - १७ जून" हातात पडली आणि "प्रतिपश्चन्द्र" सारखी एकाच बैठकीत सलग वाचून काढली. कथेचा वेग, उत्कंठा आणि प्रत्येक पानागणिक वाढत जाणारी उत्सुकता डॉक्टरांनी "प्रतिपश्चन्द्र" सारखीच या कादंबरीमध्येही तेवढ्यात ताकतीने टिकवून ठेवलेली आहे.
१७ जून २०२३ रोजी केदारनाथला झालेल्या भयंकर पावसामुळे भूस्खलन झाले आणि नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे सहा हजारांच्यावर माणसांचा मृत्यू ओढवला. (आजपर्यंत हजारो लोकांचे मृतदेहही त्यांच्या नातेवाईकांना सापडलेले नाहीयेत.) आजपर्यंत आपण बातम्यांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्येच या घटनेबद्दल ऐकत आणि वाचत आलो. पण या घटनेवर आधारित सविस्तर माहिती देणारं पुस्तक मात्र उपलब्ध झालेलं नव्हतं. कोयाडे सरांनी हि उणिवही त्यांच्या कादंबरीरूपाने भरून काढली.
बातम्यांमधे आणि वर्तमानपत्रामध्ये त्या भिषण निसर्गाचा प्रकोप वाचताना डोळ्यांत पाणी आलं होतं. अंगावर काटा उभा राहिला होता. अगदी तसेच काहीसे हि कादंबरी वाचताना थरारक आणि काळजाला स्पर्श करणारे अनुभव येत राहतात. मन सुन्न होऊन जातं. निसर्गाच्या विरोधात जेव्हा मनुष्य उभा ठाकतो तेव्हा, विश्वास आणि जिद्दीच्या बळावर तो निसर्गातील कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. जगण्याच्या लढाईत काय काय करू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव कादंबरी वाचताना होत राहतो. एका सर्वसामान्य मनुष्याच्या समोर निसर्ग जेव्हा ठाई ठाई मृत्यूला आणून ठेवतो, तेव्हा तोच माणूस जगण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, हे जेव्हा आपण अनुभवतो ना! तेव्हा अंगावर सर्रकन काटा आल्याशिवाय राहणार नाही. आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर आजूबाजूची परिस्थिती कितीही बिकट असो, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः परमेश्वरसुद्धा मदत केल्याशिवाय राहत नाही. जेव्हा सगळं काही संपलंय असं, वाटतं ना, तेव्हा कुठून तरी एखादा अनामिक आशेचा किरण उगवतो आणि पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला प्रेरणा देतो. बळ देतो. आदिमानवाच्या काळापासून मनुष्यप्राणी जगण्यासाठी निसर्गाच्या विरोधात त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करत आहे. आणि तो संघर्ष अजूनही संपलेला नाहीये.
कादंबरीमध्ये केदारनाथ खोरे, नदी, जंगल, प्राणी, डोंगर यांचा अंगावर येणारा प्रवास आणि त्यांची कधी विलोभनीय तर कधी रौद्र रूपं आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. कादंबरीतील काही प्रसंग अक्षरशः अंगावर येतात तर काही प्रसंग हृदयाला जाऊन भिडतात. जेवढं थरारक आणि उत्कंठावर्धक, तेवढंच तत्वज्ञान कादंबरीमध्ये प्रसंगानुरूप वाचायला मिळतं.
एव्हाना कथेबद्दल थोडीफार कल्पना आलीच असेल, त्यामुळे त्याबद्दल जास्त काही सांगत नाही. स्वतः पुस्तक हातात घेऊन वाचा आणि तो थरारक प्रवास नक्कीच अनुभवा.
कोयाडेसर, पुस्तक वाचून थ्री इडियटस् मधील "जहापन्हाह... तुस्सी ग्रेट हो..." डायलॉग ची आठवण झाली. सर तुमच्या लेखन रुपी कादंबऱ्यांची चवदार, चटकदार मेजवानी अशीच आमच्यासाठी मिळत राहो आणि तुमच्या पुढील लेखनासाठी खूप सदिच्छा! पुढील कादंबरीची उत्सुकता...
धन्यवाद...
ईश्वर त्रिंबक आगम...