Summary of the Book
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेली शाश्वत विकास उद्दिष्टे हा जगासमोरील अनेक आव्हानांना सामुदायिकरीत्या तोंड देण्यासाठी विचारपूर्वक आखण्यात आलेला सर्वंकष आराखडा आहे. या आराखड्याच्या संकल्पना आणि विकासात जागतिक पातळीवरील स्त्री विचारवंत आणि नेत्यांची भूमिका महत्त्वाची आणि निर्णायक ठरली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व परिषदांच्या आधी होणार्या बैठकांमध्ये स्त्रिया सहभागी असतात, सर्व महत्त्वाच्या मसलतींमध्ये स्त्रियांचा सहभाग असतो. विविध समित्यांमध्ये कोणत्या विषयांवर वाटाघाटी केल्या जाणार या प्रक्रियेतही स्त्रिया सामील असतात.
ना. डॉ. नीलम गोर्हे या 1995 सालच्या बीजिंग संमेलनापासून ते आजतागायत विकास आणि विशेषतः स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भातील या आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक लढाईमध्ये सहभागी असलेल्या भारतातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. स्त्री प्रश्नांविषयी त्यांच्या व्यापक आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनामुळे महाराष्ट्रातल्या विधानमंडळातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि बहुमूल्य ठरले आहे.
ना. डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रस्तुत केलेले हे पुस्तक शाश्वत विकास उद्दिष्टांविषयी आणि देशपातळीवरील तसेच राज्य पातळीवरील त्यांच्या अंमलबजावणीविषयी मराठीतून विस्तृत माहिती देणारे महत्त्वाचे लिखाण आहे. हे पुस्तक समाजशास्त्र, राज्यशास्त्र, स्त्रिया आणि विकास तसेच इतर अनेक मानव्यशाखांतील अभ्यासक, प्रशासनातील धोरणकर्ते आणि जिज्ञासूंसाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तसेच अधिकारी होऊ इच्छिणार्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीही हा मोलाचा संदर्भग्रंथ आहे.