Summary of the Book
‘‘ ‘अखेरचे आत्मचरित्र’ ही मराठीतील एक अनोखी कादंबरी आहे. फसवे नाव असलेली ही कादंबरी म्हणजे एका वठलेल्या म्हातार्याची हिरवी, चिरतरुण कहाणी आहे. तिचे स्वरूप आत्मचरित्राचे आहे पण आत्मा मात्र कादंबरीचा आहे. दुर्दम्य जिजिविषा असलेल्या आणि जीवनाच्या सर्व गहिर्या रसांचा आस्वाद घेणार्या एका उच्च मध्यमवर्गीय वृद्धाची ही रसरशीत कथा आहे. या म्हातार्याच्या जीवनात सांगण्यासारखे असे काहीही घडलेले नाही. तरी तो आपली जीवनकथा सांगताना कुठेही अडत नाही. रुळावरून गाडी जावी तशी ही कथा पुढे जात राहते कारण त्या म्हातार्याने स्वत:च्या चवीसाठी जसा ‘लोणंबा’ हा आबंटगोड आगळा पदार्थ तयार केला आहे; तशीच एक चटकदार, खमंग आणि खट्याळ अशी जीवनदृष्टी त्याने स्वत:साठी सहजगत्या निर्माण केलेली आहे. प्रचंड दीर्घायुष्य लाभलेल्या या म्हातार्याला ‘कशासाठी जगायचे’ हा प्रश्न कधी पडत नाही. ‘जिवंत माणसाने जगायचे असते. तो दुसरे काय करणार!’ असे त्याचे सरळ उत्तर आहे. सार्या साध्या आशयगर्भ प्रसंगांतून ही कादंबरी फुलत जाते आणि अथपासून इतिपर्यंत मानवी मनाच्या क्रीडेत मन गुंतवून ठेवते. कादंबरीच्या शैलीला पिकल्या फळाची गोडी आहे. साध्या, सरळ, रसाळ शैलीमध्ये राजेन्द्र बनहट्टी यांनी नव्वदीतल्या जख्ख म्हातार्याचे जे अफलातून चित्र रंगवले आहे ते मराठीत तरी अपूर्व ठरावे. ही म्हातार्याची आत्मकथा इतकी अस्सल आणि बेमालूम वठलेली आहे, की ही कादंबरी आहे की आत्मचरित्र याचा संभ्रम पडतो. या संभ्रमातच या कादंबरीचा सच्चेपणा आणि यश साठवलेले आहे.
- शंकर पाटील